पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला शत्रू मानूनच काम केले : मंत्री मुश्रीफ | पुढारी

पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला शत्रू मानूनच काम केले : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले होते. कोल्हापुरात येऊन त्यांनी तेच काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक नंबरचा शत्रू मानून त्यांनी काम केले, असा पलटवार वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला.

मराठा आरक्षण देण्याची काँग्रेसने तयारी केली होती. परंतु, राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्यामुळे ते राहिले, असा आरोप माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला होता. त्याबाबत मुश्रीफ म्हणाले, चव्हाण यांनी केलेल्या राष्ट्रवादीविरोधी कामामुळेच आपले सरकार राहिले नाही. काँग्रेसच्याही अनेक नेत्यांचे असेच मत आहे.

शरद पवार यांना संपविण्यासाठी भाजपने अजित पवार यांना सुपारी दिल्याच्या आमदार अनिल देशमुख यांच्या आरोपाबाबत ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांच्या बदलेल्या राजकीय भूमिकांचे आपण साक्षीदार आहोत. प्रफुल्ल पटेल यांनी प्रमोद महाजन असल्यापासून घडलेल्या घटनांचा उल्लेख केला आहे. तेव्हापासून भाजपसोबत जाण्याची तयारी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांपासून झाली होती, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे देशमुख सांगतात त्या अफवा आहेत.

भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

दरवर्षी आंदोलनाची गरज नाही

सांगली जिल्ह्यातही आता ऊस दराचे आंदोलन सुरू आहे, याबाबत ते म्हणाले, ऊस दराचे सूत्र ठरले असल्याने दरवर्षी आंदोलनाची गरज नाही. परंतु, शेतकर्‍यांच्या भावना भडकावल्या जातात. परिस्थिती वेगळी आहे आणि वास्तव वेगळे आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

Back to top button