Pune News : बीआरटी मार्गातील घुसखोरी थांबणार कधी?

Pune News : बीआरटी मार्गातील घुसखोरी थांबणार कधी?

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात 'आपले घर'समोर सोमवारी (दि. 30) दोन वाहनांचा अपघात झाला. यामुळे बीआरटीतील खासगी वाहनांच्या घुसखोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, ही समस्या सुटणार कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक खासगी वाहनचालक बीआरटी मार्गाचा सर्रास वापर करीत असल्याने अपघात व वाहतूक कोंडी होत आहे.

बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी होत असल्याने झालेल्या अपघातांत आतापर्यंत अनेकांनी जीव गमावला आहे. वाहतूक विभागाकडून बीआरटी मार्गात घुसखोरी करणार्‍या वाहनचालकांवर कधी तरीच कारवाई केली जात आहे. यामुळे खासगी वाहनचालक सर्रास बीआरटी मार्गाचा वापर करतात. नगर रस्त्यावर येरवडा ते खराडी दर्ग्यादरम्यान बीआरटी मार्ग आहे. सध्या रामवाडी ते वनाज या मेट्रोचे काम सुरू असल्याने येरवडा ते विमाननगरदरम्यान काही ठिकाणी बीआरटी मार्ग बंद आहे. विमानननगर ते खराडी दर्गादरम्यान बीआरटी मार्ग सुरू आहे.

बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी ट्रॅफिक वॉडर्नची नेमणूक केली आहे. हे वॉर्डन कधी असतात, तर कधी नसतात. त्यामुळे खासगी वाहनचालक बीआरटी मार्गात घुसखोरी करतात. या बीआरटी मार्गात घुसखोरी करणार्‍या वाहनांवर कारवाई होत नाही. यामुळे बीआरटी मार्गांमध्ये खासगी वाहनांची घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पीएमपी बसच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक पोलिस काही काळ खासगी वाहनचालकांवर कारवाई करतात. या कारवाईत सातत्य नसल्याने पुन्हा बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बीआरटी मार्गातील खासगी वाहनांच्या घुसखोरीवर महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांना अद्यापही तोडगा काढता आला नाही. महापालिकेने या मार्गावर नियमित वॉर्डन नियुक्त करणे गरजेचे आहे. पोलिसांनीही या मार्गात घुसखोरी करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

– शिवाजी वडघुले, स्थानिक नागरिक

बीआरटी मार्गात घुसखोरी करणार्‍या वाहनांवर सतत कारवाई केली जाते. परंतु, काही वाहनचालक जीव धोक्यात घालून या मार्गात घुसखोरी करीत आहेत. अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

-मनोहर ऐडेकर,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
येरवडा वाहतूक पोलिस विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news