Crime News : संयम घटतोय, द्वेष वाढतोय! तरुणांमधील मानसिकतेचे विदारक चित्र

Crime
Crime

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तरुणांमध्ये सातत्याने होणार्‍या हाणामार्‍या… किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला… एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास उचललेले टोकाचे पाऊल… एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, अशा दररोज घडणार्‍या घटना तरुणांमधील बदलत्या मानसिकतेचे विदारक चित्र दाखवत आहेत. तरुणाईमधील कमी होत असलेला संयम, वाढता द्वेष, यावर कुटुंब, समाजाकडून होणारे संस्कार आणि संवादच रामबाण उपाय ठरू शकेल, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

किशोरवयीन मुले-मुली आणि तरुणांमध्ये वाढत्या वयात अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात. या बदलांमध्ये घरात आणि समाजात घडणार्‍या घटना, टीव्ही आणि मोबाईलमधून मिळणारे ज्ञान, घरातील वातावरण यांचा खूप मोठा वाटा असतो. मालिका, सिनेमा, बातम्या, सोशल मीडिया यातून तरुणांवर माहितीचा भडिमार होत असतो. यातूनच त्यांची मानसिक जडणघडण होत असते. त्यामुळे मुले लहानपणापासून काय पाहतात, काय विचार करतात, कशी वागतात, एखाद्या घटनेला कसा प्रतिसाद देतात, याकडे पालकांनी सजगतेने पाहण्याची गरज अधोरेखित होत आहे.

जवळपास 20 वर्षांपासून संस्कार वर्ग घेणार्‍या निशा देशपांडे म्हणाल्या, 'समाजातील वाढत्या जातीयवादाचाही मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. त्यातून इतरांबद्दलचा द्वेष वाढत जातो. भविष्यात द्वेषाने रौद्ररूप धारण करू नये, यासाठी पालकांनी मुलांवर लहानपणापासून समानतेचे, सहिष्णुतेचे, सदसद्विवेकबुध्दीचे संस्कार करणे आवश्यक असते. त्यासाठी प्रार्थना, गाणी, गोष्टी, खेळ यांचा खूप उपयोग होतो. पालक संयमी, शांत, दयाळू असतील तर मुलेही त्यांच्या वागण्यातून नकळत शिकत जातात. त्यामुळे केवळ मुलांना उपदेश करण्यापेक्षा कृतीतून होणारे संस्कार दूरगामी परिणाम साधतात.'

मुलांना सिनेमात घडते ते खरे वाटते आणि ते अनुकरण करतात. तरुणाईची अपयश पचवण्याची, समोरच्याचे ऐकून घेण्याची, चूक कबूल करण्याची बरेचदा तयारी नसते. समाजातील घटनांचाही त्यांच्यावर परिणाम होतो आणि संयम कमी होत जातो. मुलांचे वागणे बर्‍याचदा जडणघडण, संगोपनावर अवलंबून असते. त्यामुळे तरुणाई हिंसेकडे वळत असताना घरातील मोठ्यांची जबाबदारी वाढली आहे. पालकांनी स्वत:चा मोबाईलचा वापर कमी करून मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधणे, चूक आणि बरोबर, यातील फरक समजावून सांगणे गरजेचे आहे.

डॉ. विद्याधर वाटवे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news