

संतोष वळसे पाटील
मंचर: पुणे-मंचरमार्गे नाशिक रेल्वेमार्ग हा या भागातील औद्योगिक गुंतवणूक वाढविणारा आणि समग्र परिसर विकासाला चालना देणारा प्रकल्प आहे. या रेल्वेमुळे स्थानिक शेतीमालाला मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वेगवान वाहतूक मिळणार आहे.
पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे आणि ग्रामीण भागाचा थेट संपर्क महानगरांशी होणार आहे. प्रवासाचा वेळ व खर्च कमी होऊन पुणे, नाशिक, मुंबई या त्रिकोणातील आर्थिक व्यवहार सुलभ होतील. परिणामी, ग्रामीण भागात रोजगार, उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांचे मोठे जाळे निर्माण होऊ शकते.
असे असताना केवळ तांत्रिक भीतीपोटी हा प्रकल्प थांबविणे किंवा रखडवणे म्हणजे लाखो नागरिकांच्या हक्काच्या विकासाच्या संधी रोखण्यासारखे आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की, विकासाचे दूरगामी निर्णय काही निवडक घटकांच्या भीतीवर किंवा दबावावर नव्हे, तर व्यापक लोकहितावर आधारित असले पाहिजेत.
प्रगतीचा वेग वाढवायचा असेल आणि ग्रामीण भागाचा कायापालट करायचा असेल, तर खेड, आंबेगाव, जुन्नरसारख्या व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या तालुक्यातूनच रेल्वे जाणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने आता वेळकाढूपणा थांबवून राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची वेळ आली आहे. विकास थांबविण्याची ऐतिहासिक जबाबदारी कोणावरही येऊ नये, यासाठी तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
पुणे-नाशिक रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास औद्योगिक, कृषी व पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल. ग्रामीण भागाचा थेट संपर्क शहरी बाजारपेठेशी होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रकल्पाबाबत सकारात्मक अपेक्षा आहेत. सरकारने आता वेळकाढूपणा थांबवून ठोस निर्णय घ्यायला हवा.
मोहन थोरात (उद्योजक, पुणे-चांडोली) / सदानंद मोरडे (मंचर-मोरडेवाडी)