

पुणे: उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वीची अखेरची रात्र आणि अखेरचा दिवस मोठ्या राजकीय घडामोडींचा ठरला. अखेरच्या तासापर्यंत रंगलेल्या शह-काटशहाच्या राजकारणात काहींच्या उमेदवारींचा पत्ता अगदी अखरेच्या टप्प्यात कट झाला, तर काहींना अखेरच्या क्षणी उमेदवारीची लॉटरी लागली. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पाहायला मिळाले.
उमेदवारीसाठीची सर्वाधिक स्पर्धा आणि रस्सीखेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास या पक्षात रंगली. त्यातच भाजपचा बालेकिल्ला ठरला असलेल्या कोथरूड मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरून घडलेले राजकारण चर्चेचे ठरले.
भाजपने घराणेशाहीला रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना बसला. त्यांचे मावसबंधू म्हणून ओळखले गेलेल्या नीलेश कोंढाळकर यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्यानंतरही त्यांची उमेदवारी रोखण्यात आली.
थेट नातवाईक नसताना पक्षांतर्गत राजकरणाचा त्यांना फटका बसला, मोहोळ यांनी ताकद लावून अखेर कोंढाळकर यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे प्रभाग क्र. 31 मयूर कॉलनी-कोथरूड या प्रभागातील राजकीय समीकरणेच बदलली. भाजपचे ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ कुलकर्णी यांच्या पत्नी जोत्स्ना कुलकर्णी यांना भाजपने उमेदवारी दिली.
तर येथील येथील माजी नगरसेविका हर्षाली माथवड यांच्या जागी त्यांचे पती दिनेश माथवड यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर प्रभाग क्र. 9 सूस, बाणेर- पाषाण या प्रभागातील भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना पक्षाने अखेरपर्यंत उमेदवारीसाठी झुंजवत ठेवले.
अर्ज भरण्यास अवघे दोन तास उरले असताना पक्षाने लहू बालवडकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे अमोल बालवडकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिजाई निवासस्थान गाठले. हातात घड्याळ बांधून त्यांनी लगेचच राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळविला. त्यामुळे या प्रभागातील राष्ट्रवादीची गणिते अखेरच्या क्षणी बदलली.
बालवडकरांच्या प्रवेशाने माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांचा पत्ता कट झाला. पूनम विधाते यांनाही उमेदवारीपासून थांबावे लागले. प्रभाग क्र. 8 औंध-बोपोडीमध्ये एका सर्वसाधारण जागेवर माजी नगरसेवक सनी निम्हण आणि बंडू ढोरे यांच्यातील रस्सीखेच अखेरपर्यंत रंगली. पक्षाने निम्हण यांना थेट महिला उमेदवार द्यावे, असे आदेश दिले.
अन्यथा दुसरा पर्याय म्हणून प्रभाग क्र. 7 मधून उमेदवारीचा पर्याय दिला. मात्र, ज्या प्रभागातून तयारी केली, तिथेच उमेदवारी मिळत नसल्याने सैरभर झालेल्या निम्हण यांनी जोरदार फिल्डिंग लावली. सोमवारी रात्री अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढोरेंऐवजी निम्हण यांची उमेदवारी निश्चित केली.
त्यामुळे नाराज झालेल्या ढोरे यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी घेतली. त्यांनी माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांना समवेत घेऊन भाजपला धक्का दिला. अशाच पद्धतीने प्रभाग क्र. 29 डेक्कन जिमखाना हॅपी-कॉलनी या प्रभागात माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या उमेदवारीवरून अखेरच्या दिवसापर्यंत रस्सीखेच रंगली.
पोटे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवरून त्यांच्याऐवजी सुनील पांडे या कार्यकर्त्याला पक्षाने एबी फॉर्म दिला. मात्र, पोटे यांनी वरिष्ठ पातळीपर्यंत फिल्डिंग लावली. त्यामुळे पांडे यांना देण्यात आलेल्या एबी फॉर्म थांबविण्यात आला.
मात्र, अखेरच्या दिवशी पांडेंना उमेदवारीचा ग््राीन सिग्नल मिळाला अन् पोटेंचा पत्ता कट झाला. कोथरूडपाठोपाठ वडगाव शेरीतील अखेरच्या टप्प्यातील घडामोडी चर्चेच्या ठरल्या. राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशामुळे या मतदारसंघातील अनेक प्रभागातील गणिते बदलली.
स्वत: सुरेंद्र पठारे प्रभाग क्र. 3 विमाननगर-लोहगाव येथून निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. मात्र, सोमवारी रात्री घडलेल्या घडामोडीनंतर पठारे यांनी प्रभाग क्र. 4 खराडी-वाघोलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या यांना प्रभाग क्र. 3 मधून उमेदवारी मिळाली. या घडामोडीमुळे या प्रभागातील भाजपचे माजी नगरसेवक मुक्ता जगताप, श्वेता खोसे-गलांडे आणि राहुल भंडारे यांचा पत्ता कट झाला.
त्याचबरोबर प्रभाग क्र. 4 मधील गणिते बदलून भैय्यासाहेब जाधव आणि सुमन पठारे यांना माघार घ्यावी लागली. नाराजी टाळण्यासाठी तडजोड म्हणून प्रभाग क्र. 3 मधील भंडारे यांचे प्रभाग क्र. 1 कळस-धानोरी येथे पुनर्वसन करून त्यांची पत्नी अश्विनी भंडारे यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे या प्रभागात मिळालेली एकमेव जागा रिपाइंला सोडावी लागली. कसबा विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र.26 मधील घोरपडे पेठ, गुरुवार पेठ-समताभूमी या प्रभागातील एकमेव सर्वसाधारण जागेवरून माजी नगरसेवक अजय खेडेकर आणि समाट थोरात यांच्यात उमेदवारीसाठी अखेरपर्यंत रस्सीखेच रंगली.
दोघेही उमेदवारीवरून अडून बसल्याने भाजपने एबी फॉर्म थांबविला होता. मात्र, अखेरच्या क्षणी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी त्यांचे वजन खेडेकरांच्या पारड्यात टाकले. त्यामुळे खेडेकर यांना पक्षाने एबी फॉर्म दिला.
परिणामी, थोरात यांना पत्नीला उमेदवारी देण्यासाठी तयार व्हावे लागले, तर शिवसेनेतून भाजपवासी झालेल्या प्रभाग क्र. 24 मधून गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीत असलेल्या पल्लवी जावळे यांनाही प्रभाग क्र. 23 मध्येही उमेदवारी घ्यावी लागली.
घराणेशाही नको या निकषामुळे पर्वती मतदारसंघात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना चिरंजीव करण मिसाळ याला उमेदवारी देता येऊ शकली नाही. मात्र, त्यांच्या भावजयी माजी नगरसेविका मानसी देशपांडे यांच्या उमेदवारीला या निर्णयाचा फटका बसू नये यासाठी मिसाळ यांनाही अखेरपर्यंत धावाधाव करावी लागली.
अखेर मंगळवारी दुपारी देशपांडे यांना एबी फॉर्म मिळाल्याने मिसाळ यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. एकंदरीतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या.