

पुणे : पुण्यातील एका हॉटेलमध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना मंगळवारी एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार होते. त्यासाठी जमा झालेल्या उमेदवारांमध्ये एकच राडा झाला. “माझं नाव आधी, आम्हाला डावललं जातंय” अशा आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चिघळले. आणि पैसे घेऊन एबी फॉर्मचे वाटप पक्षात केले जात असल्याचा खळबळजनक आरोप इच्छुक उमेदवारांनी केल्याचे दिसून आले.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळाले. भाजपकडून अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी शिंदे सेनेतील काही नेत्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे. भाजपकडून शिंदे सेनेला 15 जागा सोडण्याची तयारी असल्याचे संकेत असले, तरी स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये यावरून नाराजी आहे. दरम्यान, उदय सामंत पुण्यात बैठकीला येण्यापूर्वीच नीलम गाेऱ्हे आणि विजय शिवतारे यांनी हॉटेलमध्ये जमलेल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केले.
उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू असतानाच पुण्यातील हॉटेलमधील सहाव्या मजल्यावर वादावादी, घोषणाबाजीचे प्रकार घडल्याने अखेर हॉटेल मालकाला पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने तणाव आणखी वाढला हाेता. फॉर्म मिळत नसल्याचा आरोप करत काही पदाधिकाऱ्यांनी थेट गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच हॉटेल प्रशासनाने हस्तक्षेप केला. मात्र, वाद थांबत नसल्याने अखेर हॉटेल मालकाने पोलिसांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची विनंती केली. या संपूर्ण प्रकारामुळे पुण्यात शिंदे गटाची अंतर्गत वादावादी पुन्हा एकदा समोर आली.
एकीकडे भाजपसोबतच्या युतीतील जागावाटपाचा तिढा, तर दुसरीकडे स्थानिक नेत्यांची नाराजी आणि कार्यकर्त्यांचा उद्रेक यामुळे शिवसेनेसमोर मोठे संघटनात्मक आव्हान उभे ठाकले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये भाजप-सेना युतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे शिवसेना पदाधिकारी तसेच उमेदवारांचे लक्ष लागले आहे.