

पुणे : सातारा येथे होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वैविध्यपूर्ण साहित्यिक उपक्रम अनुभवतानाच महाराष्ट्रीय पौष्टिक खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे. सातारा, कोरेगाव, मावळ, जावळीचे खोरे येथील वैशिष्ट्य असलेल्या विविध पदार्थांचा समावेश भोजनात आवर्जून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीत प्रामुख्याने असणारे आमटी, भात, पोळी, भाकरी, भाजी, मसालेभात यांच्यासह ताटात डाव्या बाजूला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कोशिंबीर असणार आहेत. महाराष्ट्रासह सातारची ओळख असलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद चारही दिवस घेता येणार आहे.
या काळात ताटातील डावी बाजू सजविताना एक दिवस शेंगदाण्यापासून बनणाऱ्या साताऱ्यातील 'म्हाद्या'ची चव खवय्यांना मिळणार आहे. तर मावळ प्रांत, जावळीचे खोरे या भागात प्रसिद्ध असलेली काळ्या घेवड्याची आमटी देखील असणार आहे. साहित्य उपक्रमांचा आनंद अनुभवत असतानाच रोज एका पक्वान्नाचा आस्वाद घेता येणार आहे. केशर-वेलचीयुक्त श्रीखंड, अस्सल खव्यापासून बनविलेले गुलाबजाम, अननसाचा शिरा आणि जिलबी यांचा समावेश भोजनात असणार आहे, अशी माहिती भोजन समितीचे प्रमुख संजय माने तसेच वजिर नदाफ, राजेश जोशी यांनी दिली.
संमेलनात ग्रंथप्रदर्शन, कवी कट्टा, गझल कट्टा, बहुरूपी भारूड, कवी संमेलन, बालकुमार वाचक कट्टा, विविध विषयांवर परिसंवाद, अभिनेते प्रशांत दामले यांचा 'शिकायला गेलो एक' या नाटकाचा प्रयोग, कथाकथन, ज्येष्ठ कवियत्री अनुराधा पाटील यांची मुलाखत, समकालीन पुस्तकांवर चर्चात्मक कार्यक्रम, अमोल पालेकर लिखित 'ऐवज - एक स्मृतीबंध' या पुस्तकावर संवादात्मक कार्यक्रम, हास्यजत्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पुस्तकांवर चर्चासत्र असे वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत.