

पुणे: महापालिकेच्या शाळांना आता सुटीच्या उंबरठ्यावर असतानाच प्रशासनाने बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी खेळणी व शैक्षणिक साहित्यखरेदीचा तब्बल सव्वातीन कोटींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ही खरेदी विद्यार्थ्यांसाठी आहे, की ठेकेदारांसाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने मध्यवर्ती भांडार विभागाकडे बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य पुरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत दोन निविदा प्राप्त झाल्या असून, तांत्रिक छाननीनंतर दोन्ही पात्र ठरल्या.
त्यामध्ये डायमंड फायरफायटर अँड फॅबिकेशन यांनी 3 कोटी 14 लाख 68 हजार 600 रुपयांची सर्वात कमी निविदा सादर केली, तर हेमदीप एंटरप्रायझेस यांची निविदा 3 कोटी 49 लाख 48 हजार 400 रुपयांची होती. कमी दराच्या आधारे डायमंड कंपनीकडून साहित्यखरेदीस मंजुरी देण्याचा प्रस्ताव आता गुरुवारी होणार्या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी आला आहे.
या खरेदीसाठी 2025-26 च्या अंदाजपत्रकात तरतूद असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी आर्थिक वर्ष संपल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याने शंका उपस्थित होत आहेत. विशेषतः शाळांना सुटी लागण्याच्या अगोदरच ही प्रक्रिया का राबविण्यात आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रस्तावातील माहिती अपुरी?
स्थायी समितीकडे आलेल्या प्रस्तावात शिक्षण विभागाने साहित्याची मागणी नेमकी कधी केली, निविदा प्रक्रिया कधी राबवली, किती निविदा प्राप्त झाल्या व त्यांपैकी किती अपात्र ठरल्या याची सविस्तर माहिती प्रस्तावात दिलेली नाही. केवळ दोन निविदा पात्र ठरल्याचा उल्लेख आणि अंदाजपत्रकातील तरतूद एवढीच माहिती नमूद करण्यात आली आहे. तब्बल सव्वातीन कोटींच्या खरेदीसाठी फक्त दोनच निविदा आणि त्यामध्ये ठेकेदारांनी दिलेले दर पाहता या निविदांमध्ये ठेकेदारांनी रिंग केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता स्थायी समिती विद्यार्थ्यांचे हित पाहणार, की ठेकेदारांचे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.