

पुणे: बजाज पुणे ग््राँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत प्रोलॉग रेसने आयोजनातील भव्यता आणि जागतिक स्तरावरील दर्जा अधोरेखित केला आहे. स्पर्धेचा उत्साहवर्धक पूर्वरंग असलेली 7.5 किलोमीटरची प्रोलॉग (टाइम ट्रायल) रेसला दुपारी 1.30 वाजता सुरुवात झाली. शहरातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्या स्पर्धकाला हिरवा झेंडा दाखवत अधिकृत सुरुवात केली.
यावेळी, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह मान्यवर अधिकारी उपस्थित होते. या प्रोलॉग रेसमध्ये स्पर्धकांनी वैयक्तिक स्वरूपात एकामागोमाग एक मिनिटाच्या अंतराने सुरुवात केली. ही मास स्टार्ट रेस नसून, प्रत्येक सायकलपटूची वैयक्तिक वेळ निर्णायक ठरणार आहे. पुणेकर नागरिकांनी शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवरून जाणाऱ्या सायकलपटूंचे उत्साहात स्वागत केले. स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्ये आशिया खंडातील 78, युरोपमधील 69, तर ओशनिया, अमेरिका आणि आफिका खंडांतील सायकलपटू सहभाग घेत आहेत.
ढोल-ताशांचा निनाद आणि शिवगर्जना
स्पर्धेच्या शुभारंभावेळी नामदार गोपाळ कृष्ण गोखले परिसर ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेला होता. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या गगनभेदी घोषणांनी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारली. पारंपरिक मराठमोळ्या तालावर पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत केले. भारतीय खेळाडूंचे नाव उच्चारताच टाळ्यांच्या कडकडाट करून त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला.
मराठमोळी परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम
मराठमोळा पोशाख, भगवे फेटे, ढोल-ताशे आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल रेस या सगळ्यांचा सुरेख संगम पुण्याच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला. परंपरेचा सन्मान राखत आधुनिक क्रीडासंस्कृतीला चालना देणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने पर्यटनाला चालना मिळणार आहे. यानिमित्ताने पुणेकरांच्या आदरातिथ्याचा अनुभवही जगभरातील खेळाडूंना घेता येईल. त्याची सुरेख सुरुवात या मराठमोळ्या स्वागताने झाली.
मस्कॉटद्वारे महाराष्ट्राचा शेकरू पोहोचला आंतरराष्ट्रीय पटलावर
बजाज पुणे ग््राँड टूरचे रंगीत बोधचिन्ह उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. मस्कॉटसोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. क्रीडा स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप देणारा हा क्षण सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा ठरला. यानिमित्ताने महाराष्ट्राचा ‘शेकरू’ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. निसर्ग आणि खेळ यांच्यातील नाते घट्ट करणारी ही स्पर्धा असून ‘इंदू’ त्याचेच प्रतीक आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून वावरणारा शेकरू या वाटेने येणाऱ्या सायकलपटूंच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
हिंजवडी येथून पहिल्या टप्प्याला सुरुवात
‘बजाज पुणे ग््राँड टूर-2026’ अंतर्गत टप्पा क्रमांक एकच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, हा टप्पा मंगळवार, दि. 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजून 30 वाजता टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची प्रशासनाकडून सखोल पाहणी करण्यात आली आहे. स्पर्धा मार्गावर आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार असून काही कालावधीसाठी मार्ग बंदही ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या टप्प्यातील एकूण अंतर 91.8 किलोमीटर असून स्पर्धा दुपारी 1 वाजून 30 वाजता टी.सी.एस सर्कल, हिंजवडी फेज-3 येथून सुरू होईल. त्यानंतर माण अंबवडे गाव कमान पौडचाले नांदगाव कोळवण हडशी लेकजावण तिकोना पेठ कालेकड धेथुगाव शिवणे डोणे सावळे चौक आढळे बुद्रुक बेबडओहळ चंदनवाडी चांदखेड कासारसाई नेरे मारुंजी लक्ष्मी चौक भूमकर चौक डांगे चौक श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास या टप्प्याचा समारोप होणार आहे.