

Chhatrapati Sambhajinagar Election 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे अचानक बदलली आहेत. शिंदेगटाच्या शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या भूमिकेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संभाजीनगरमध्ये युती टिकवण्यासाठी वरच्या पातळीवर प्रयत्न झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले, अनेक बैठका झाल्या. मात्र स्थानिक पातळीवर भाजपची भूमिका सुरुवातीपासूनच वेगळी आणि संशयास्पद वाटत होती. “मी सातत्याने स्थानिक नेत्यांशी चर्चा करत होतो. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशीही बोलणी झाली. पण जमिनीवर परिस्थिती काहीशी वेगळीच होती,” असे त्यांनी सांगितले.
शिरसाट म्हणाले की, शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर जागावाटपावर एकमत झाले होते. त्यामुळे युती होणार, अशी खात्री आम्हाला वाटत होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ येताच भाजपकडून शिवसेनेच्या जागाच कमी करण्याचा प्रस्ताव समोर आला. “आमच्या कार्यकर्त्यांना ही भूमिका अजिबात मान्य होऊ शकत नव्हती. सन्मानजनक जागावाटपाशिवाय युती शक्य नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भाजपवर टीका करताना शिरसाट यांनी आरोप केला की, एकीकडे युतीबाबत सकारात्मक बोलायचं आणि दुसरीकडे शिवसेनेला दुय्यम स्थान देणारे प्रस्ताव मांडायचे, ही भाजपची दुहेरी भूमिका आहे. “आजही भाजपकडून कोणताही नवा किंवा सन्मानजनक प्रस्ताव आलेला नाही. उलट ‘आमची ताकद वाढली आहे, आम्ही काहीही करू शकतो’ असा अहंकारी सूर भाजपचा दिसत होता,” असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर, भाजपच्या भूमिकेमुळेच संभाजीनगरमध्ये शिवसेना (शिंदेगट) आणि भाजप यांच्यातील युती तुटल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत संभाजीनगरचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.