

पुणे: पुणे महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली असून, येत्या 16 तारखेला सकाळी 10 वाजता अधिकृत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत बहुतांश प्रभागांचे निकाल जाहीर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला, तरी उमेदवारांची वाढलेली संख्या, प्रत्येक प्रभागासाठी लावण्यात आलेली टेबल व्यवस्था आणि मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांमुळे अखेरच्या प्रभागाचा निकाल रात्री 10 वाजेपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरातील सर्व मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा आणि प्रवेश-नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी प्रत्येक टेबलवर स्वतंत्र कर्मचारी, निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यंदा चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एका प्रभागासाठी मतमोजणीच्या अनेक फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या मतमोजणी केंद्रांवर एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण करून निकाल जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाणार आहे.
मतमोजणीसाठी 15 केंद्रांवर एकूण 335 मतमोजणी टेबल ठेवण्यात आले आहेत. यातील 38 टेबल टपाली मतदानासाठी, तर उर्वरित 297 टेबल मतदान यंत्रासाठी राहणार आहेत. एका प्रभागासाठी कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 12 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणी सकाळी 10 पासून सुरू होणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट करण्याचा प्रयत्न असला तरी एका फेरीसाठी साधारण 35 ते 45 मिनिटे लागणार आहे. मात्र, काही प्रभागांत उमेदवारांची संख्या मोठी आहे. येथे मतमोजणीसाठी टेबलांची संख्या वाढवण्यात आली असली तरी फेऱ्यांची संख्या जास्त असल्याने निकाल येण्यास उशीर लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाचा लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असला तरी, अंतिम प्रभागाचा निकाल हाती येण्यास 10 वाजण्याची शक्यता आहे. काही मोठ्या आणि चुरशीच्या प्रभागांचे निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडणार आहे. महापालिकेच्या 41 प्रभागांसाठी 165 जागा आहेत. यासाठी 1 हजार 155 उमेदवार रिंगणात आहेत. 41 प्रभागांमध्ये 4 सदस्यीय 49 प्रभाग आहेत, तर प्रभाग क्रमांक 38 हा पाचसदस्यीय आहे.
विशेष आराखडा तयार
राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, सकाळपासूनच मतमोजणी केंद्रांच्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण, जमावबंदी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष आराखडा तयार केला आहे. प्रशासनाचा प्रयत्न दुपारपर्यंत शहराच्या सत्तेचे चित्र स्पष्ट करण्याचा असला, तरी खऱ्या अर्थाने पुण्याच्या महापालिकेचा अंतिम सत्ता समीकरण रात्री उशिरापर्यंतच ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका एका प्रभागाचा निकाल होणार जाहीर
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही मतमोजणी पार पडणार असून, एका क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दोन ते तीन प्रभागांचा समावेश आहे. निकाल लवकर लावण्यासाठी प्रशासनाने एका वेळी एका प्रभागाची मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रभागाच्या मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
आतापर्यंत 2 हजार 889 टपाली मतदानाची नोंद
महापालिकेने टपाली मतदानासाठी 12 हजार मतपत्रिकांचे वितरण केले आहे. टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे. 15 तारखेपर्यंत मतदान करता येणार आहे. निवडणूककामात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार असून, आतापर्यंत 2 हजार 889 मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. एका प्रभागाचा निकाल लागल्यावर दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाणार आहे. पहिल्या दोन तासांत पहिला निकाल येण्याची शक्यता आहे. 4 वाजेपर्यंत सर्व निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी काही ठिकाणी मतमोजणीसाठी जादा टेबलांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी उमेदवारांची संख्या जास्त आहे, तेथील निकाल लावण्यासाठी देखील नियोजन करण्यात आले आहे.
ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी