

पुणे: आगामी पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुका होईपर्यंत मनपाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे कोणतेही प्रस्ताव सादर करू नयेत, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात येताच अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या मर्जीच्या प्रभागातील क्षेत्रीय कार्यालयात बदली मिळावी, यासाठी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निवडणुका संपेपर्यंत विविध कारणे दाखवून किंवा विनंतीच्या स्वरूपात येणारे बदली प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिका निवडणुकांशी संबंधित मतदार यादी अंतिम करणे तसेच त्यानुसार निवडणूकप्रक्रिया राबवणे, ही सध्या अत्यंत महत्त्वाची आणि प्राधान्याची कामे सुरू आहेत. यासाठी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक कामांवर नेमण्यात आले. या कालावधीत बदल्यांचे प्रस्ताव मंजूर झाल्यास निवडणूक कामकाजावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक पूर्ण होईपर्यंत बदलीसंदर्भातील कोणतेही प्रस्ताव खातेप्रमुखांनी मंजुरीसाठी सादर करू नयेत, असे आदेशात नमूद केले आहे. मात्र, निवडणूकविषयक किंवा अत्यंत तातडीच्या आणि महत्त्वाच्या प्रशासकीय कामाच्या अनुषंगाने अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या आवश्यक असल्यास, अशा प्रस्तावांना महापालिका आयुक्तांची पूर्वमंजुरी घेणे बंधनकारक राहणार आहे.
याबाबत सामान्य प्रशासन विभागाने विशेष दक्षता घेण्याचेही निर्देश दिले आहेत. दरम्यान, शहरातील अनेक राजकीय नेते तसेच माजी नगरसेवकांकडून आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांची बदली आपापल्या प्रभागातील क्षेत्रीय कार्यालयात करून घेण्याचे प्रकार यापूर्वीही वारंवार घडले आहेत. अशा बदल्यांमुळे संबंधित कर्मचारी आपल्या भागात कार्यरत राहून निवडणूक प्रचारासाठी मदत करतात, तसेच प्रशासनातील अंतर्गत माहिती उपलब्ध करून देतात, असा आरोपही केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक काळात बदल्यांवर स्थगिती आणण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्याचे बोलले जात आहे.
बदलीनंतर निवडणूक कामास देतात नकार
कौटुंबिक कारणे पुढे करून प्रशासनावर राजकीय दबाव आणत बदल्या करून घेतल्या जात असल्याचे प्रकार समोर आले असून, बदली झाल्यानंतर हेच कर्मचारी निवडणूक कामासाठी नेमणूक झाली असतानाही ती कामे करण्यास नकार देत बदल्या रद्द करण्याची मागणी करतात.