

पुणे: सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटरदरम्यान नव्याने उभारलेला उड्डाणपूल नियोजित मेट्रो मार्गासाठी तब्बल 66 ठिकाणी फोडला जाणार आहे. येत्या काही महिन्यांत हे काम सुरू होणार असतानाही पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने या उड्डाणपुलाच्या आकर्षक विद्युतरोषणाईसाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. यापूर्वीही या पुलावर दिवे बसविण्यासाठी मोठा खर्च केला आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटरदरम्यान दोन्ही बाजूंनी उड्डाणपूल बांधले आहेत. तरीही वाहतूक कोंडी कायम आहे. एक उड्डाणपूल राजाराम चौकाजवळ, तर दुसरा विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरदरम्यान आहे. या उड्डाणपुलांचे काही टप्पे यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले केले असून, माणिकबाग ते विठ्ठलवाडी या उड्डाणपुलाचा अंतिम टप्पाही नुकताच वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
दरम्यान, खडकवासला ते हडपसर या नियोजित मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. हा मेट्रोमार्ग सिंहगड रस्त्यावरून जाणार असल्याने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पमध्ये मेट्रो पिलरची उभारणी आधीच केली आहे. मात्र, उड्डाणपुलाच्या मधल्या भागात येणाऱ्या मेट्रो पिलरसाठी उड्डाणपूल तब्बल 66 ठिकाणी फोडावा लागणार असून, हे काम पुढील काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.
तरीही महापालिकेच्या विद्युत विभागाने उड्डाणपुलावरील विद्युतरोषणाईचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी 1 कोटी 79 लाख 25 हजार 92 रुपयांच्या खर्चाच्या निविदा काढल्या असून, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या निविदांना मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
एकीकडे हा उड्डाणपूल काही महिन्यांतच फोडला जाणार असताना त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत तीव नाराजी व्यक्त केली जात आहे.