

पिरंगुट: दिघी पोर्ट बंदर, कोलाड-पुणे या महामार्गावर असलेल्या भूगाव (ता. मुळशी) परिसरात दररोज मोठी वाहतूक कोंडी होते. येथे केवळ पाच किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल दोन तासांचा कालावधी लागत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांसह स्थानिक मुळशीकरांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
या महामार्गावर दोन्ही बाजूंना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर अतिक्रमणे झालेली आहेत. त्याचप्रमाणे या परिसरातील सॉंग बर्ड रहिवासी गृहसंकुलातील तसेच परिसरातील अनधिकृत रहिवासी गृहप्रकल्पातील वाहनांमुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारचा एखादा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे.
येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी टाऊन प्लॅनिंगच्या नकाशामध्ये हा रस्ता 60 मीटर रुंद आहे. त्याप्रमाणे हा रस्ता झाला तर या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही. भूगावातून जाणारा बाह्यवळण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे घोटावडे फाटा, पिरंगुट येथील मोठी वाहतूक कोंडी होते. प्रवाशांसह येथील नागरिक या कोंडीला वैतागले आहेत. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार शंकर मांडेकर यांनी यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या त्या ठिकाणी बावधन पोलिस ठाण्याच्या वतीने वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न सुरू असतात. मात्र, येथे पोलिस कर्मचारीसंख्या कमी असल्यामुळे काही स्थानिक नागरिक त्यांना मदत करतात. परंतु, या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय काढणे गरजेचे आहे. या वाहतूक कोंडीबाबत परिसरातून लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.