

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी 41 प्रभागामधील मंगळवारी (दि. 11) आरक्षण सोडत गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. या आरक्षण सोडतीची जय्यत तयारी महापालिकेच्या निवडणूक विभागाने केली आहे. सोमवारी याची रंगीत तालिम प्रशासनाने पूर्ण केली आहे. या सोडतीनंतर खऱ्या अर्थाने पुण्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोणता उमेदवार कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार, घरातील महिला निवडणूक लढणार की पुरुष यासह कुणाचा पत्ता कट होणार, हे देखील स्पष्ट होणार आहे. यामुळे अनेक इच्छुकांचा रक्तदाब वाढला असून, अनेकांनी देवाला साकडेदेखील घालण्यास सुरुवात केली आहे.(Latest Pune News)
निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने सुरू केली आहे. यासाठी खास अधिकाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाली असून आता आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापालिकेच्या 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील 40 प्रभाग 4 सदस्यीय असून प्रभाग 38 हा 5 सदस्यांचा आहे. या प्रभागांसाठी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिलांसाठीचे आरक्षित प्रभाग मंगळवारी निश्चित होणार आहेत.
17 नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूपावर 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हरकती आणि सूचना सादर करता येतील. 24 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत असेल. हरकती महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा प्रभाग कार्यालयात लेखी स्वरूपातच स्वीकारल्या जातील. ऑनलाइन किंवा ई-मेलद्वारे पाठविलेल्या हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत प्रसिद्ध केली जाईल.
प्रथम एसटी, त्यानंतर एससी आणि मग ओबीसी अशा क्रमाने आरक्षण काढले जाणार आहे. आरक्षण असलेल्या प्रभागांमध्ये चक्राकार पद्धत लागू राहील. यासाठी रंगीत तालिम करण्यात आली आहे. शालेय मुलांच्या हस्ते आरक्षण काढले जाणार आहे. ही प्रक्रिया दोन ते अडीच तासांत पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
इच्छुक लागले तयारीला
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रारूप आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. ही सोडत जाहीर झाल्यावर पुण्याचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. तीन वर्षांनंतर निवडणुका होणार असल्याने प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षनेत्यांची मोठी दमछाक होणार आहे. या निवडणुकीत काही दिग्गज नेते एकाच प्रभागात एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीचा ज्वर आता आणखी रंगतदार होणार आहे. त्यामुळे कुणाला वातावरण अनुकूल ठरणार हे आरक्षणांनंतर स्पष्ट होणार आहे. काही नेते आपल्या कुटुंबातील महिला वर्गांना उमेदवारीसाठी पुढे करतील, अशीही कुजबूज सुरू झाली आहे.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबरला होणार असून, निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. त्यांनंतरच पुणे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे, तर अनेक इच्छुक आता तयारीला लागले आहे. त्यांच्या तयारीला आरक्षण सोडतीनंतर आणखी जोर येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आणि भाजपनेही आपल्या वरिष्ठ नेत्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत, तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) दोघांनीही आपापल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी सर्व जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत काही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
प्रत्येक पक्षात इच्छुकांची संधी मोठी असल्याने प्रत्येकाला उमेदवारी मिळणार याची शाश्वती नाही. त्यामुळे नाराज गट इतर पक्षात उड्या मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी रंगतदार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या उमेदवारामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांना पक्षाची दारे खुली असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भाजपमधून लढण्यास इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याची चर्चा आहे.
नावे बदललेल्या प्रभागांची नावे
1) कळस - धानोरी- लोहगाव उर्वरित
14) कोरेगाव पार्क- घोरपडी- मुंढवा
15) मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडेसतरानळी
17) रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी
20) शंकर महाराज मठ-बिबवेवाडी
24) कसबा गणपती- कमला नेहरू हॉस्पिटल- केईएम हॉस्पिटल
26) घोरपडे पेठ- गुरुवार पेठ- समताभूमी
38) बालाजीनगर- आंबेगाव- कात्रज
प्रभागाचे नाव
1) कळस - धानोरी
- लोहगाव उर्वरित
2) फुलेनगर - नागपूर चाळ
3) विमाननगर - लोहगाव
4) खराडी - वाघोली
5) कल्याणीनगर - वडगाव शेरी
6) येरवडा - गांधीनगर
7) गोखलेनगर - वाकडेवाडी
8) औध - बोपीडी
9) सूस - बाणेर- पाषाण
10) बावधन - भुसारी कॉलनी
11) रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर
12) छत्रपती शिवाजीनगर-
मॉडेल कॉलनी
13) पुणे स्टेशन-जय जवान नगर
14) कोरेगाव पार्क -
घोरपडी - मुंढवा
15) मांजरी बुद्रुक - केशवनगर - साडेसतरा नळी
16) हडपसर - सातववाडी
17) रामटेकडी- माळवाडी- वैदुवाडी
18) वानवडी - साळुंखे विहार
19) कोढवा खुर्द- कौसरबाग
20) शंकर महाराज मठ- बिबवेवाडी
21) मुकुंदनगर - सलिसबरी पार्क
22) कासेवाडी- डायस प्लॉट
23) रविवार पेठ - नाना पेठ
24) कसबा गणपती- कमला नेहरू रुग्णालय- के ई. एम. रुग्णालय
25) शनिवार पेठ - महात्मा फुले मंडई
26) घोरपडे पेठ- गुरुवार पेठ -समताभूमी
27) नवी पेठ पार्वती
28) जनता वसाहत- हिंगणे खुर्द
29) डेक्कन जिमखाना- हॅप्पी कॉलनी
30) कर्वेनगर- हिंगणे होम कॉलनी
31) मयूर कॉलनी - कर्वेनगर
32) वारजे - पॉप्युलरनगर
33) शिवणे -खडकवासला
34) नऱ्हे- वडगाव बुद्रुक
35) सनसिटी-माणिकबाग
36) सहकारनगर-पद्मावती
37) धनकवडी -कात्रज डेअरी
38) बालाजीनगर- आंबेगाव- कात्रज
39) अप्पर सुपर- इंदिरानगर
40) कोंढवा बुद्रुक -येवलेवाडी
41) महंमदवाडी- उंड्री