

पुणे : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 1 लाख 87 हजार 695 हेक्टरइतके आहे. त्यापैकी सद्यःस्थितीत 53 हजार 639 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 29 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामध्ये ज्वारीच्या 46 टक्के तर मक्याच्या 35 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. पावसाने उघडीप घेतल्यामुळे आता रब्बी पिकांच्या पेरण्यांनी गती घेण्यास सुरुवात केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.(Latest Pune News)
जिल्ह्यातील पूर्व तालुक्यांमध्ये प्रामुख्याने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांची स्थिती चांगली आहे. चालूवर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाणी उपलब्धता अधिक आहे. शिवाय दीर्घकाळ लांबलेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांना थोडासा विलंब झालेला आहे. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरण्या वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सध्या शिवारात सर्वत्र रब्बी पेरण्यांची लगबग दिसून येत आहे.
ज्वारी पिकाचे सर्वाधिक म्हणजे 88 हजार 337 हेक्टरइतके क्षेत्र आहे. ज्वारीची तालुकानिहाय झालेली पेरणी हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. जुन्नर 699, खेड 8067, आंबेगांव 6288, शिरुर 5122, बारामती 6633, इंदापूर 1026, दौंड 1086, पुरंदर 9366, हवेली 430, मुळशी 153, भोर 1215, मावळ 127 तर वेल्हे 7 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे चालूवर्षी ज्वारीची सरासरी क्षेत्राहून अधिक पेरणी अपेक्षित मानली जात आहे.
पाणी उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांकडून गहू आणि हरभरा पिकांच्या पेरण्यांनाही अधिक प्राधान्य दिले जाईल. भात पिकाची काढणी सध्या सुरु आहे. त्यानंतर विशेषतः हरभरा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहतो. शिवाय गव्हाच्या पेरणीसही पाणी उपलब्धतेनुसार प्राधान्य दिले जाते. शिवाय मका पिकाखालील क्षेत्रही वाढत आहे. मक्याला असलेला चांगला दर आणि जनावरांच्या हिरव्या चाऱ्यामुळेही शेतकऱ्यांचे प्राधान्य वाढलेले असल्याचे त्यांनी सांगितले.