

पुणे: गेल्या साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस उलटले तरीही उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. शुक्रवारी केवळ 8 जणांनी उमेदवारी अर्ज भरले, तर इच्छुकांनी मात्र विक्रमी अर्जखरेदी केली आहे. अर्जखरेदीसाठी प्रचंड उत्साह आणि स्पर्धा असून, गेल्या तीन दिवसांत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तब्बल 9,101 नामांकन अर्ज खरेदी केले आहेत. नामांकन दाखल करण्यासाठी चार दिवस शिल्लक असून, अर्ज विक्रीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार आहेत. शहरातील 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडण्यासाठी शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
या कार्यालयांद्वारे नामांकन पत्र विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी, मंगळवारी (23 डिसेंबर) एकूण 2,886 नामांकन अर्ज विकले गेले. दुसऱ्या दिवशी, बुधवारी (24 डिसेंबर) 3,551 नामांकन अर्ज विकले गेले. पहिल्या दोन दिवसांत एकूण 6,437 नामांकन अर्ज विकले गेले. शुक्रवारी, एकूण 2,664 नामांकन अर्ज विकले गेले. आतापर्यंत एकूण 9,101 नामांकन अर्ज विकले गेले आहेत.
या 8 उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
अर्ज खरेदीबरोबरच, नामांकन दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. अर्ज भरण्यास अद्याप वेग आलेला नाही. शुक्रवारी एकूण 8 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. यात बिबवेवाडी येथील 3, वारजे-कर्वेनगर येथील 2 आणि ढोले पाटील रोड, नगर रोड-वडगाव शेरी आणि कोथरूड-बावधन येथील कार्यालयातून प्रत्येकी 1 उमेदवारांचा समावेश होता. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर अमोल काळे (अपक्ष), सुमय्या मेहबूब नदाफ (कॉंग््रेास), रुपेश राम केसकर (अपक्ष), योगीता भरत सुराणा, (कॉंग््रेास, अ आणि ब फॉर्म नाही), भरत बस्तीलाल सुराणा (कॉंग््रेास, अ आणि ब फॉर्म नाही), मोहित बराटे, कॉंग््रेास (दोन अर्ज) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
कोथरूड-बावधनमधून सर्वाधिक अर्जविक्री
निवडणुकीसाठी शुक्रवारी एकूण 2,664 नामांकन अर्ज विकले गेले. शुक्रवारी नामनिर्देश अर्जविक्रीच्या यादीत कोथरूड-बावधन कार्यालयाने अव्वलस्थान पटकावले, सर्वाधिक 567 अर्ज विकले गेले. याउलट, सर्वात कमी विक्री कसबा-विश्रामबागवाडा कार्यालयात झाली, जिथे फक्त 87 अर्ज विकले गेले. याशिवाय, येरवडा-कलास-धानोरी येथे 229, भवानी पेठ येथे 223, हडपसर-मुंढवा येथे 176, वारजे-कर्वेनगर येथे 174, बिबवेवाडी येथे 167, शिवाजीनगर-घोले रोड येथे 166, वानवडी-रामटेकडी येथे 164, औंध-बाणेर येथे 140, धनकवडी-सहकारनगर येथे 138, सिंहगड रोड येथे 122, ढोले पाटील रोड येथे 110, कोंढवा-येवलेवाडी येथे 105 आणि नगर रोड-वडगाव शेरी कार्यालयात 96 उमेदवारी अर्जांची विक्री झाली.