

पुणे: माजी नगरसेवकांना तिकीट नाकारणे, एकाच जागेवर दोन नगरसेवकांनी दावा सांगणे आदी कारणांमुळे बंडखोरी तसेच दुसऱ्या पक्षात उडी मारणे, असे खेळ गेल्या काही दिवसांत रंगले. परिणामी, पुण्यातील अनेक प्रभागांमध्ये तुल्यबळ अशा आजी-माजींमध्ये रंगतदार लढती होणार आहेत. या हाय व्होल्टेज लढतींकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.
पुणे महापालिकेचा बिगुल वाजला असून, शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, दोन्ही राष्ट्रवादी, कॉंग््रेास-शिवसेना-मनसे यांच्यात ही प्रामुख्याने लढत होणार आहे. या सर्व पक्षांनी आपले मतब्बर नेते मैदानात उतरविले आहेत. भाजपचे निवडणूकप्रमुख गणेश बिडकर हे प्रभाग क्रमांक 23 मधून सर्वसामान्य गटातून उभे असून, त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर हे मैदानात उतरले आहेत. या दोघांमध्येही हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. त्याचबरोबर भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले संदीप जऱ्हाड, अमोल बालवडकर, किरण बारटक्के, धनंजय जाधव तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले सचिन दोडके, सायली वांजळे, दिलीप बराटे व त्यांचा पुतण्या आदींच्या लढतींकडे विशेष लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे योगेश मुळीक व राष्ट्रवादीचे संदीप जऱ्हाड एकमेकांविरोधात उभे आहेत. प्रभाग सातमध्ये माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेशमा भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग््रेासचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम निवडणूक रिंगणात उभे आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे सनी निम्हण यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे प्रकाश ढोरे यांची लढत लक्षवेधी ठरणार आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सर्वाधिक चर्चेत आलेले अमोल बालवडकर हे राष्ट्रवादीकडून प्रभाग 9 मध्ये लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे लहू बालवडकर हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. याच प्रभागातून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे आणि भाजपचे गणेश कळमकर यांची लढत देखील लक्षवेधी ठरणार आहे. प्रभाग 10 मध्ये गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी कॉंग््रेासच्या तिकिटावर लढत आहे. त्यांच्याविरोधात भाजपच्या रूपाली पवार उभ्या आहेत. याच प्रभागातून भाजपचे दिलीप वेडे-पाटील राष्ट्रवादीच्या शंकर केमसे यांच्याविरोधात उभे आहेत.
राष्ट्रवादी कॉंग््रेासचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन मानकर प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे अजय मारणे उभे आहेत. भाजपच्या निवेदिता एकबोटे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वसाधारण गटातून आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दीपक (बाळासाहेब) बोडके हे रिंगणात आहेत. प्रभाग 21 मध्ये भाजपच्या कोअर कमिटीचे प्रमुख सदस्य श्रीनाथ भिमाले निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर कॉंग््रेासचे नवखे उमेदवार अक्षय जैन निवडणूक लढवत आहे. प्रभाग 24 मधून सदानंद शेट्टी यांच्या पत्नी सुजाता ह्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. त्यांच्याविरोधात भाजपच्या उज्ज्वला यादव ह्या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. प्रभाग 25 मधून राष्ट्रवादी कॉंग््रेासच्या प्रवक्ता रूपाली ठोंबरे-पाटील यांच्याविरोधात भाजपच्या स्वप्नाली नितीन पंडित निवडणूक लढवत आहेत. याच प्रभागातून भाजपकडून राघवेंद्र मानकर, भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट निवडणूक रिंगणात आहेत. तसेच, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग 26 मधून भाजपचे अजय खेडकर आणि राष्ट्रवादीचे विजय ढेरे एकमेकांविरोधात उभे आहेत.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणूक रिंगणात प्रभाग क्रमांक 27 मधून उभे असून, त्यांच्याविरोधात शिवसेना उबाठातून राष्ट्रवादीत गेलेले अशोक हरणावळ निवडणूक रिंगणात आहेत. याच प्रभागातून राष्ट्रवादीकडून धनंजय जाधवविरोधात भाजपचे अमर आवळे निवडणूक रिंगणात उभे आहेत. प्रभाग 36 मधून भाजपचे महेश वाबळे यांच्याविरोधात कॉंग््रेासमधून शिवसेनेत गेलेले माजी नगरसेवक आबा बागूल निवडणूक लढवत आहेत. याच प्रभागातून भाजपच्या विणा घोष ह्या राष्ट्रवादी कॉंग््रेासचे शहाराध्यक्ष सुभाष जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. प्रभाग 31 मधून शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले पृथ्वीराज सुतार यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे हे निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार गटाला राम राम करीत कॉंग््रेासमध्ये प्रवेश केलेले माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याविरोधात कॉंग््रेासमधून भाजपमध्ये गेलेले अभिजित शिवरकर हे निवडणूक रिंगणात उभे असून, या लढतीकडे देखील सर्व शहराचे लक्ष आहे. तर, कॉंग््रेासचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे प्रभाग 13 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे सोनू निकाळजे उभे आहेत. तर, राष्ट्रवादीकडून विकार अहमद मुखतार शेख रिंगणात आहेत. प्रभाग 22 मधून माजी आमदार रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे, त्यांच्या पत्नी इंदिरा बागवे या निवडणूक रिंगणात आहेत.
बंडू आंदेकर कुटुंबीयातील सदस्य या प्रभागातून लढणार
नातू आयुष कोमकर हत्या प्रकरणात कुख्यात गुंड बंडू आंदेकरची सून सोनाली आणि भावजय लक्ष्मी ह्या कारागृहात आहेत. सोनाली आणि लक्ष्मी यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आहे. या दोघी प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने अनुराधा मंचे, ऋतुजा गडाळे यांना उमेदवारी दिली आहे. याच उमेदवारीवरून भाजपने राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.