

पुणे: नववर्षाच्या रात्री मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या 208 वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. 40 ठिकाणी नाकाबंदी करून शहराच्या वेगवेगळ्या भागात नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले आहेत.
तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 51 वाहने मोटार कायद्यानुसार जप्त केली आहेत. उल्लंघनापोटी 74 हजार 400 रुपयांचा आर्थिक दंड वसूल केला आहे. या वेळी पोलिसांनी 2 हजार 128 वाहनांची तपासणी केली.
नववर्ष स्वागताला भरधाव वेगाने वाहने चालवल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहनचालकांंविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले होते. नववर्ष स्वागताला मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम (ड्रंक अँड ड्राइव्ह) राबविली होती.
शहरातील वेगवेगळ्या भागात 40 ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत 208 वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी बीथ ॲनलायचर यंत्राचा वापर केला. यंत्राला जोडलेली प्लास्टिक नळी (ब्लोअर पाईप) प्रत्येक तपासणीनंतर नष्ट करण्यात आली.
नववर्षाच्या रात्री 11 ते पहाटे पाचपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात 208 मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. या कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना स्थानिक पोलिसांनी सहकार्य केले. मुंढवा, बाणेर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा, बालेवाडी परिसरात पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता.