

पुणे: पुणे महापालिकेच्या लढतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल 969 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वैध ठरलेल्या 2 हजार 134 उमेदवारांपैकी 1 हजार 165 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. 41 प्रभागांतील 165 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यातील दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे 163 जागांवर निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता पुढील 15 दिवस शहरात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी तब्बल 3 हजार 41 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 31 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती, तर 1 आणि 2 तारखेला उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस होता. गुरुवारी एकूण 67, तर शुक्रवारी अर्जमाघारीच्या दिवशी तब्बल 969 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 1 हजार 165 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहे. 15 जानेवारी रोजी मतदान असून, 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
अर्जमाघारीनंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवार यादी अंतिम झाल्याने आता उमेदवार प्रत्यक्ष प्रचाराला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दरम्यान, निवडणुकीचे कामकाज हे निष्पक्ष व पारदर्शीपणे होणे आवश्यक असून, आचारसंहिताभंगाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीवर निष्पक्षपणे कार्यवाही करावी.
प्रत्येक प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, विशेषत: रात्रीच्या वेळी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी पथकांमार्फत कारवाईचे प्रमाण वाढवावे, आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, निवडणुका आदर्श व पारदर्शी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा स्पष्ट सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक राहुल महिवाल (भा.प्र.से.) यांनी पुणे महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक राहुल महिवाल यांनी शुक्रवार (दि. 2) रोजी दुपारी साडेचार वाजता स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी संबंधित विभागांचे अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील कामकाजाच्या सद्य:स्थितीची, तर सर्व प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाजाची अद्ययावत माहिती दिली.