

पुणे: ‘वासुदेव आला हो वासुदेव आला...’ असा आवाज आपण आपल्या प्रभागात ऐकलाच असेल... देवगीते गाणाऱ्या वासुदेवांच्या आवाजात उमेदवारांची प्रचारगीते आपल्या कानावर पडू लागली आहेत. प्रचाराच्या नव्या फंड्यामध्ये वासुदेवांसह हलगी, संबळ, टाळ, तुणतुणे, खंजिरी आदी पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या लोककलावंतांचाही सहभाग दिसून येत आहे. लोककलेच्या माध्यमातून प्रचार करण्याची अनोखी शक्कल उमेदवारांनी लढविली असून, लोककलावंत प्रभागांमध्ये जाऊन लोककलांचे सादरीकरण करून उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत.
लोककलावंतांचे विविध गट पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये जाऊन कलेचे सादरीकरण करत आहेत. प्रचारफेऱ्यांमध्येही पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमतोय. महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवारांकडून नवनवीन शक्कल लढवल्या जात आहेत. सोशल मीडियाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रचारावर भर दिला जात आहेच. पण प्रत्यक्ष प्रचारावरही प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.
उमेदवारांच्या प्रचारासाठी शहर आणि अगदी ग््राामीण भागातील अनेक लोककलावंत काम करीत आहेत. पारंपरिक पेहरावात सकाळी आणि सायंकाळी प्रभागात जाऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करणाऱ्या वासुदेवांसह प्रभागांमध्ये निघणाऱ्या प्रचारफेऱ्यांमध्ये हलगी, संबळ, टाळ आदी वाद्यांचा आवाज ऐकू येत आहे. लोककलावंत मोठ्या उत्साहात कलेचे सादरीकरण करीत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील लोककलावंतांना काम मिळाले आहे.
याविषयी लोककलावंत राहुल पवार म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारांमध्ये लोककलावंतांचाही सहभाग पाहायला मिळत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे उमेदवारांच्या प्रचारासाठी कलावंत काम करीत आहेत. वासुदेव हे विविध प्रभागांत सकाळी आणि सायंकाळी जाऊन आपल्या कलेचे सादरीकरण करत मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करीत आहेत. तसेच आम्ही लोककलावंतांचे पाच गट तयार केले आहेत. एका गटात संबळ, हलगी, टाळ, तुणतुणे, खंजिरी असे पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांचा सहभाग आहे. प्रचारफेऱ्यांमध्ये लोकवाद्यांचे वादन आम्ही कलावंत करीत आहोत. कलावंतांच्या कला सादरीकरणाला प्रतिसादही मिळत आहे.
डीजे-साऊंडपेक्षा या प्रचाराला महत्त्व
विविध ठिकाणी उमेदवारांचा जोरदार प्रचार होताना दिसत असून, उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या आणि मतदारांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. प्रचारफेऱ्यांमध्ये ढोल-ताशा वादनासह सर्वाधिक घुमतोय तो लोकवाद्यांचा आवाज... संबळ, हलगी, टाळ, तुणतुणे, खंजिरी या लोकवाद्यांचे वादन प्रचारफेऱ्यांच्या दरम्यान कलावंतांकडून होत आहे. डीजे, साऊंड लावण्यापेक्षा लोककलांच्या सादरीकरणाद्वारे होणाऱ्या प्रचाराला महत्त्व दिले जात आहे.