

पुणे: परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल 706 गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 (2) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचे दिसून येते.
परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या विविध पोलिस ठाण्यांच्या गुन्हे अभिलेखांचा आढावा घेऊन ही कारवाई केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारहाण, शिवीगाळ, धमकी, बेकायदेशीर अग्निशस्त्र व लोखंडी शस्त्रांचा वापर, घरफोडी, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, दंगा, हल्ला, दरोड्याची तयारी, खंडणी, बेकायदेशीर दारू विक्री, दहशत माजवणे तसेच सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा यामध्ये समावेश आहे. ही कारवाई स्वारगेट (108), सहकारनगर (107), पर्वती (100), बिबवेवाडी (100), मार्केट यार्ड (59), भारती विद्यापीठ (125) आणि आंबेगाव (107) या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांवर केली असून एकूण आकडा 706 एवढा आहे. कारवाईनंतर सराईतांना तत्काळ या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून बाहेर पडण्याचे निर्देश देण्यात आल्याचे देखील मोहिते यांनी सांगितले.
पोलिसांनी दि. 15 जानेवारी रोजी आदेश काढून संबंधित आरोपींना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवत, परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ, स्वारगेट, आंबेगाव, पर्वती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी व सहकारनगर पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश, वास्तव्य, सार्वजनिकरीत्या वावरणे, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा मिरवणुकीत सहभागी होणे यास सक्त मनाई केली आहे. तसेच, सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अशाच स्वरूपाची कारवाई यापूर्वी 10 जणांविरुद्धही करण्यात आलेली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
गुन्हेगारांचा पूर्वअभिलेख पाहून सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील 706 जणांवर ही प्रतिबंधात्मका कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तत्काळ परिमंडळ दोनची हद्द सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी देखील अशाच प्रकारे दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कोणत्याही गुन्हेगारांचा प्रभाव राहणार नाही याची खबरदारी पोलिस घेत आहेत.
मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन