

पुणे: पतंग उडविण्यासाठी गेलेला 12 वर्षीय मुलगा इमारतीतील सहाव्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात घडली. अर्धवट बांधकाम केलेल्या इमारतीतील जिन्याला कठडे नव्हते. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
श्लोक नितीन बांदल (वय 12, रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द, कात्रज ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत श्लोकचे मामा अमोल सुभाष इंगवले (वय 35, रा. औदुंबर निवास, कात्रज गावठाण) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक योगेश शिळीमकर, महेश धूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द परिसरात एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. गृहप्रकल्पाच्या शेजारील सोसायटीत बांदल कुटुंबीय राहायला आहेत. श्लोक पाचवीत होता. त्याचे वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी (8 जानेवारी) शाळा सुटल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास श्लोक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत पतंग उडविण्यासाठी गेला. सहाव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने श्लोक गंभीर जखमी झाला.
टेरेसच्या डक्टमधून तो खाली पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी घटनास्थळी भेट दिली.
इमारतीचे काम सुरू असल्याची माहिती चौकशीत मिळाली. इमारतीतील जिन्यांना कठडे नसल्याचे उघडकीस आले. बांधकाम व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.