

पुणे: कल्याणीनगरमधील एका फ्लॅटमध्ये हत्यारांसह शिरून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांनी 24 तासांत अटक केली. त्यांची चौकशी केली असता फिर्यादीच्या घरातील अल्पवयीन मुलीने बॉयफेंडचे घरभाडे थकल्याने पैसे मिळविण्यासाठी त्याच्या मित्रांचे मदतीने हा प्रकार केल्याचे समोर आले. यश मोहन कुऱ्हाडे (वय 20, रा. केसनंद), वृषभ प्रदीप सिंग (वय 21, रा. चऱ्होली), प्राज विवेक भैरामडगीकर (वय 18, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत कल्याणीनगरमधील एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता घडली.
फिर्यादी या घरात बसलेल्या असताना तोंडावर मास्क व हुडी घातलेले दोन जण आत आले. त्यांच्या हातात सुरी, सुतळी व टेप दिसल्यावर त्यांनी दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. तरीही ते दार ढकलून आत आल्यावर त्या बेडरूममध्ये जाऊन आरडाओरडा करू लागल्या. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, येरवडा पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले.
त्यात एक व्यक्ती मास्क लावून खाली थांबल्याचे, तसेच ते तिघे घराकडे मास्क व हेल्मेट घालून जाताना व काही वेळाने परत येताना दिसून आले. याबाबत चौकशी सुरू असताना त्यांच्या येथील एक अल्पवयीन मुलगी एवढा मोठा प्रकार घडला असताना तेथून निघून गेली. तिच्याकडे चौकशी केल्यावर तिने तिचा बॉयफेंड आल्याने जात असल्याचे सांगितले. त्या मुलीच्या बॉयफेंडला तिच्या घरातील ओळखत होते. त्यामुळे तो इतर दोघांसोबत वरती गेला नाही. हे पोलिसांनी तपासात अचूक हेरलं.
असा झाला उलगडा
पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीचा बॉयफेंड इकडे काय करतो, याची चौकशी केली. त्यातून हा सर्व उलगडा झाला. फिर्यादी यांच्या पुतणीचा बॉयफेंड आहे. त्याचे घरभाडे थकले होते. या मुलीने माझ्या काकांकडे एका व्यवहाराचे पैसे आहेत. तुम्ही चोर म्हणून येऊन पैसे घेऊन जा असे सांगितले. परंतु त्यानंतर महिनाभर काही झाले नाही. पुढील महिन्याचे भाडे थकल्याने त्यांनी जुना प्लॅन अंमलात आणायचे ठरविले. काकाच्या घरी कधीही न जाणारी ही पुतणी त्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन बसली. तेथून तिने बॉयफेंडला फोन केला. त्यानंतर तिच्या बॉयफेंडच्या मित्रांनी येऊन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु घरातील महिलेने आरडाओरडा केल्याने ते गोंधळून गेले व तेथून पळून गेले.
यांनी केली कारवाई
पोलिस उपनिरीक्षक महेश फटांगरे, पोलिस अंमलदार नटराज सुतार यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तिघांना अटक केली. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर, विजय ठकार, पीएसआय महेश फटांगरे, पीएसआय प्रदीप सुर्वे, पोलिस अंमलदार नटराज सुतार, संदीप जायभाय, गणेश पालवे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे यांनी केली आहे.