

पुणे: नागरिकांचे मूलभूत प्रश्न हे नगरसेवकांनी सोडविले पाहिजेत. परंतु, इच्छुक उमेदवार हे नागरिकांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्यात धन्यता मानतात. शहरात वाहतूक, पाणी, रस्ते, नागरिकांची सुरक्षा, प्रदूषण, वाढती गुन्हेगारी आदी गंभीर प्रश्न आहेत. हे प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे असल्याचे मत दै. ‘पुढारी’च्या व्यासपीठावर पुणेकर सजग नागरिकांनी व्यक्त केले आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुका हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न हे महानगरपालिकेकडून सोडविले गेले पाहिजेत. परंतु, या वेळेस मात्र इच्छुक उमेदवार हे नागरिकांना तीर्थयात्रेला घेऊन जाणे, हवाईयात्रेला घेऊन जाणे, कोकण पर्यटनाला घेऊन जाणे, अशी आश्वासने देत आहेत. यामुळे आपली लोकशाहीच धोक्यात येण्याची वेळ आलेली आहे. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, रस्ते सुरक्षा, या विषयांवर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे.
मनोज पवार, नवी पेठ
सध्याच्या पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी पुण्यातील वाहतुकीची वाढती समस्या सोडवावी. पुण्यातील स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा नागरिकांना उपलब्ध करून द्यावा. पुण्यातील रस्त्युाची स्वच्छता व धूळमुक्त पुणे करावे. नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना व मदत करावी. गुन्हेगारीमुक्त पुणे करावे. पोलिस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्यावर दबाव न आणता त्यांना योग्य पद्धतीने काम करू द्यावे आणि आपल्या पुण्याचे स्वच्छ सुंदर आणि गुन्हेगारीमुक्त पुणे करावे, हीच अपेक्षा आहे.
नितीन मेटे, पुणे
अवजड वाहने, बिल्डरांचे काँक्रीट मिक्सर्सचे उद्योग आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी, यांसह विविध घटकांमुळे हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. यामुळे पुणेकरांचा अक्षरशः श्वास रोखला गेला आहे. पुणेकर शहरांच्या प्रश्नांविषयी जागरूक असूनही राजकारणी, बिल्डर लॉबी यांच्या अभद्र युतीपुढे नागरी सुविधांची वानवा आहे. अनेक सोसायट्यांना आज पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करूनही पायाभूत सेवा वेळेवर मिळत नाहीत. या सुविधांचा विकास गरजेचा असून, एक पुणेकर म्हणून इथल्या आगामी लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे आहे
रविकुमार सुभाषराव, सदाशिव पेठ
पुण्याचे रस्ते हा थट्टेचा विषय झाला आहे. ‘महिन्याला रस्ते दुरुस्ती’ हे एक रॅकेट झाले आहे का? अशी शंका येते. एकाच रस्त्यावर वारंवार कामे काढून, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करून करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी. शहरात कोयता गँगसारखे प्रकार आणि वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. सीसीटीव्ही कॅमेरे केवळ नावापुरते नसावेत, तर ते कार्यरत असावेत. सुरक्षिततेसाठी पोलिस आणि महापालिका यांच्यात योग्य समन्वय असावा. मुठा नदीचे पाणी स्वच्छ राहण्यासाठी ठोस उपाययोजना हवी आहे. नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी त्वरित बंद झाले पाहिजे. नदी ही पुण्याची जीवनवाहिनी आहे, गटार नाही, याचे भान प्रशासनाने ठेवावे. पुणे शहरामध्ये सध्या कचरा व्यवस्थापन ही मोठी समस्या बनली आहे. याकडे महापालिकेने योग्य लक्ष दिले पाहिजे.
रामराजे राजेंद्र उबाळे, पुणे
दिवसेंदिवस पुणे शहराचा विस्तार होत आहे. परंतु, या वाढत्या शहरीकरणाबरोबरच वाहतुकीचे नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. अनेकवेळा नवीन उड्डाणपूल बांधले जातात आणि ते काही वर्षांतच तोडले जातात. उदाहरण म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूल. म्हणून मला एक नागरिक म्हणून असे वाटते की, वाढत्या शहरीकरणाला पूर्वनियोजन असले पाहिजे. प्रशासनाने ही बाब अतिशय गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे.
रोहित राऊत, नारायण पेठ
कोथरूड येथील मृत्युंजयेश्वर मंदिरालगत नाल्यामध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे सांडपाणी अडून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे डास व डुकरांचा उपद्रव वाढला असून, नव्या लोकप्रतिनिधींनी किमान या त्रासातून तरी आमची सुटका करावी, अशी अपेक्षा आहे. कर्वे रस्त्यावर उभारलेल्या फूट ओव्हर बिजची लिफ्ट बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढून पूल ओलांडणे कठीण जाते. या लिफ्ट व्यवस्थित चालू राहतील, याकडेही पालिकेने लक्ष दिले पाहिजे. अनेक ठिकाणी पदपथावरील चांगले पेव्हिंग ब्लॉक काढून टाकून नवीन पदपथ केले गेले. त्याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
प्रदीप काजळे, कोथरूड
पुणे महापालिका आणि प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवाव्यात. शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवावी, त्याचबरोबर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत. अनेकवेळ मध्यवस्तीतील पेठांमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याने पाण्याची टंचाई जाणवते. पाण्याचे नियोजन व्यवस्थित असावे. कचऱ्याचे नियोजन करावे.
नंदकुमार साधू जाधव, पुणे
महापालिकेच्या वतीने मूलभूत नागरी सुविधा, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, खराब रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्त रस्ते, स्ट्रीटलाइट व्यवस्थित चालू असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहतूक व पायाभूत सुविधा, पार्किंग व्यवस्था, फुटपाथ, ड्रेनेज, नाले साफसफाई, महापालिका रुग्णालयांची सेवा सुधारणा, हरित क्षेत्रे, उद्याने वाढवावीत. स्थानिक तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी.
दीपाली महेंद्र कडू, सिंहगड रोड
महापालिकेच्या वतीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी. पादचाऱ्यांना अतिक्रमणमुक्त पदपथ आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत. कचऱ्याची विल्हेवाट वेळच्या वेळी करून पाण्याचे चांगले नियोजन करावे.
कल्याणी आनंद सराफ, मंडई
पुनर्विकासामुळे राहणे कठीण पुनर्विकासाची कामे करताना कोणतेही नियम पाळले जात नसल्याने रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रात्र-रात्र सुरू असलेल्या खोदकामामुळे रात्रीची झोप उडाली असून, त्याविरुद्ध तक्रार करण्याचीही सोय राहिलेली नाही. महापालिका प्रशासन व पोलिसांकडे याबाबत तक्रारी केल्या, तर तात्पुरती कारवाई होते. परंतु,वून बिनदिक्कतपणे ही कामे केली जातात. नव्याने सत्तेवर येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात निर्णय घेऊन कोथरूडमधील रहिवाशांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, एवढीच अपेक्षा.
विजयसिंह चव्हाण, पौड रस्ता, कोथरूड
ड्रेनेजव्यवस्था रसातळाला, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य इमारत साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकच्या वाहतुकीमुळे गल्लीबोळातील काँक्रीटचे रस्ते उखडले असून, अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत. पदपथांची अवस्थाही अत्यंत बिकट असून, त्यावरून चालणेही शक्य नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. रस्त्याप्रमाणेच ड्रेनेजची अवस्थाही बिकट झाली असून, अनेक ठिकाणी चेंबर्स खचल्याने सतत ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडतात. कोथरूडमधील पाण्याची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याला पुरेसे प्रेशर नसते. त्यामुळे सोसायट्यांच्या टाक्याही भरत नाहीत. परिणामी, कोथरूडसारख्या भागात राहत असूनही टँकर्स मागवावे लागतात. नव्या लोकप्रतिनिधींनी रहिवाशांचे हे मूलभूत प्रश्न तरी सोडवावेत, अशी अपेक्षा आहे.
मंगल वाघोले, कोथरूड
कचऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे कचरापेटीमुक्त वॉर्डची कल्पना कोथरूडमध्ये राबविली असली, तरी कचऱ्याच्या प्रश्नातून सोडवणूक झालेली नाही. कचरापेट्या असलेल्या जागेवर आता कचऱ्याचे ढीग लागत आहेत. त्यात कुत्री व डुकरांच्या वावरांमुळे परिसरच अस्वच्छ करतात. कचरावेचक घरी येऊन कचरा नेतील, असे सांगितले जाते. मात्र, सोसायट्यांमध्ये संकलित केलेला कचरा नेण्यासाठी तीन-तीन दिवस गाड्या येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. महापालिकेने कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे.
नागेश नलावडे, कोथरूड