

पुणे: महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा मंगळवारी 13 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता थंडावल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वक्त्यव्यांनी शहर जणू राजकीय आखाडाच झाल्याचे दिसून आले. दरम्यान बुधवारचा एकच दिवस हातात असल्याने लक्ष्मीदर्शनासाठी चढाओढ लागल्याची चर्चा रंगल्याने त्यावर आमचा कडक वॉच असेल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली.
मंगळवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रभागातून सकाळी 7 पासूनच प्रचार रॅली निघाल्या होत्या. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते अन् उमेदवार सजून-धजून बाहेर पडले. दुपारी 3 वाजेपर्यंत शहरात प्रचंड कोलाहल सुरू होता. नागरिक हा राजकीय आखाडा उत्सुकतेने पाहात होते. घरा-घरांत जाऊन प्रचार झाल्याने मतदार राजाचा भाव वाढला होता. अनेकांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.
एका घरात 20 ते 25 उमेदवारांची हजेरी
सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रभागात मतदारांच्या घरी उमेदवारांनी हजेरी लावली. एका प्रभागात चौरंगी, पंचरंगी लढती असल्याने एका घरांत 20 ते 25 उमेदवार येऊन गेले. प्रसिध्दी पत्रके वाटत रॅली काढत उमेदवारांनी शहर दणाणून सोडले. पक्षाचे ध्वज घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
आज रात्रभर जागते रहो अन् वॉच
शहरात सुमारे 4 हजार केंद्रांवर गुरुवारी 15 रोजी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. मंगळवारी प्रचार संपल्याने कार्यकर्त्यांना बुधवारचा एकच दिवस नियोजनासाठी मिळणार आहे. त्यामुळे बुधवारची रात्र ही जागरणाची राहणार आहे. यात नेते, कार्यकर्ते अन् उमेदवार यांच्यासाठी ही रात्र महत्वाची आहे. त्या रात्री मात्र पैशाचे गैरव्यवहार रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी माहिती प्राप्तीकर विभागाच्या सूत्रांनी दिली.
बिर्याणीसह दारूची प्रचंड विक्री झाल्याची चर्चा
सायंकाळी 5 वाजता प्रचारतोफा थंडावल्या आणि कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार सुरू झाला. गल्ली-बोळातील हॉटेल, टपऱ्यांमध्ये नाश्ता, जेवणासाठी गर्दी दिसत होती. थकल्या-भागल्या कार्यकर्त्यांसाठी खास जेवण ठेवले होते. मात्र काहींसाठी खास ओल्या पार्ट्या व शहरात बिर्याणीसह दारूची प्रचंड विक्री झाल्याची चर्चा रंगली होती.