

साक्षी कदम
पुणे: महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि याच रणधुमाळीमध्ये राज्य निवडणुक आयोग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिल्याने या निवडणुका दोन टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे.
५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या या निवडणुका आसणार आहे. छत्रपती संभाजीनगर, धराशिव, लातूर, परभणी, सोलापुर, कोल्हापुर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग अशा १२ जिल्हा परिषदांचा आणि १२५ पंचायत समितींचा समावेश आहे. आरक्षणाचे उल्लंघन झालेल्या ठिकाणी या निवडणुकांच्या तारखा नंतर जाहीर होणार आहेत.
सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी सगळे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे तर नागपुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुरु आहे. १५ तारखेला मतदान आणि १६ ला मतमोजणी नंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा बिगुल वाजणार आहे.
या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात आचारसंहिताही लागू होणार आहे. दोन टप्पयांत होणाऱ्या या निवडणुकीच्या तारखांकडे सर्व पक्षांच लक्ष लागलं आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे.