

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची अधिकृत सांगता मंगळवारी सायंकाळी झाली असली तरी प्रत्यक्ष लढाई आता अधिक तीव होण्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आता कोणत्याही उमेदवारांना जाहीर सभा, पदयात्रा, रॅली किंवा वाहन फेरी काढता येणार नाही. परंतु उमेदवारांना थेट मतदारांच्या घरी जाऊन वैयक्तिक भेटी घेण्याची मुभा दिली आहे. या भेटी एकट्याने किंवा अत्यंत मर्यादित स्वरूपात कराव्या लागतील; समूहाने प्रचार करण्यास सक्तमनाई आहे. तसेच पत्रके, बोशर किंवा कोणतेही प्रचारसाहित्य वाटण्यासही बंदी आहे. त्यात बुधवारी मकरसंक्रांत असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी छुप्या पद्धतीने प्रलोभने दाखवण्याचा खेळ सुरू होण्याची चर्चा आहे.
गेल्या 15 दिवसांपासून शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 41 प्रभागातील 165 जागांसाठी ही लढत होणार आहे. या लढतीत दोन जागा बिनविरोध निवडल्या आहेत. उरलेल्या 163 जागांसाठी तब्बल 1 हजार 155 उमेदवार प्रचारात गुंतले होते. सभा, रॅली, पदयात्रा, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्न केला. मंगळवारी सायं. 5.30 वाजता हा प्रचार संपला. त्यामुळे आता छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार उमेदवारांना आता मतदारांच्या थेट घरी जाऊन वैयक्तिक भेटी घेण्याची मुभा आहे.
मात्र, कोणतेही पत्रक, स्टीकर किंवा प्रचार साहित्य मतदारांना देता येणार नाही. या नियमांमुळे प्रचाराची पद्धत पूर्णपणे बदलली असून, उमेदवार शेवटच्या क्षणी ‘घराघरात जाऊन’ मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न आता होणार आहे. उमेदवार स्वतः दारावर जाऊन मतदारांशी संवाद साधत, त्यांचे प्रश्न ऐकून घेत, शेवटचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रचार थांबला असला तरी आता खऱ्या अर्थाने ‘पडद्यामागचा खेळ’ सुरू होणार आहे. या वैयक्तिक भेटींच्या आड मोठ्या प्रमाणावर ‘लक्ष्मी रूपी’ प्रचार सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही प्रभागांमध्ये थोड्याशा मतांसाठी मोठी रक्कम खर्च करण्याची तयारी काही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्याची शक्यता आहे. रोख रक्कम, गिफ्ट कूपन, किराणा किट, मोबाइल रिचार्ज, तसेच विविध वस्तूंच्या स्वरूपात मतदारांना आमिष दाखवले जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवारचा दिवस व रात्र निवडणूक प्रक्रियेसाठी सर्वात संवेदनशील टप्पा ठरणार आहे.
मकरसंक्रांतीदिनी छुपा प्रचार जोरात
बुधवारी मकरसंक्रांत साजरी होत असल्याने या सणाचाही वापर छुप्या प्रचारासाठी केला जाण्याची भीती आहे. निवडणूक आयोगाने यानिमित्त भेटवस्तू देण्यास मनाई केली असली तरी, तिळगूळ, सणाच्या भेटवस्तू, गोड पदार्थ किंवा घरगुती पॅकेट्स यांच्या आड रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सार्वजनिकरीत्या भेटवस्तू देणे शक्य नसले, तरी ’सणाच्या निमित्ताने’ घराघरात पोहोचणाऱ्या पिशव्यांमध्ये काय आहे, यावर प्रशासन आणि निवडणूक निरीक्षकांची विशेष नजर राहणार आहे.
संशयास्पद हालचालींवर राहणार पोलिसांची नजर
शहरातील अनेक प्रभागांमध्ये लढत अत्यंत चुरशीची असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतांचे अंतर अत्यल्प राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शेवटच्या क्षणी मतदारांचे मत वळवण्यासाठी प्रत्येक मार्ग वापरण्याचा मोह काही घटकांना होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधून विशेष पथके तैनात केली आहेत. रात्री उशिरापर्यंत संशयास्पद वाहनांची तपासणी, रोख रकमेची वाहतूक, घराघरांत होणाऱ्या हालचाली यावर कडक नजर ठेवली जाणार आहे.
गैरप्रकार आढळल्यास थेट तक्रार करा
निवडणूक आयोगाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणी पैसे, भेटवस्तू किंवा अन्य स्वरूपाचे प्रलोभन देत असल्यास तत्काळ तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन आणि निरीक्षक उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. मतदारांनी कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.