

पुणे: महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीतील ५९ हजार ७९५ विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यावर वैयक्तिक लाभ योजनेअंतर्गत (डीबीटी) २२ कोटी ९८ लाख २ हजार ६८४ रुपये जमा करण्यात आले आहेत.
या निधीतून आवश्यक शालेय साहित्य तातडीने खरेदी करून त्याच्या पावत्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा कराव्यात, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केले.
महापालिकेने इयत्तानिहाय निधी विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला असून, या रकमेतून गणवेश, दप्तर, बूट, मोजे, वह्या, रंगपेटी, चित्रकला साहित्य, स्टेशनरी, लिखाण साहित्य तसेच दर दोन वर्षांनी स्वेटर खरेदी करता येणार आहे. विद्यानिकेतन आणि क्रीडा निकेतन शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विशेष गरजांनुसार साहित्य स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.
भिमाले यांनी सांगितले की, बालवाडी-१, बालवाडी-२, इयत्ता पहिलीतील नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच यू-डायस प्रणालीवरील कायमस्वरूपी विद्यार्थी नोंदणी क्रमांक (पेन) तयार होण्याची प्रक्रिया सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर पेन क्रमांक उपलब्ध होताच डीबीटीद्वारे निधी जमा केला जाईल.
तसेच, माध्यमिक विभागातील सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांसाठी डीबीटीची बिलिंग प्रक्रिया सुरू असून, ती १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदा डीबीटी प्रक्रिया १८ जूनपासून सुरू करण्यात आली होती. विधान परिषद निवडणुकीच्या आचार संहितेमुळे काहीसा विलंब झाला असला, तरी मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे भिमाले यांनी सांगितले.