

पुणे: कात्रज परिसरातून तब्बल ५ कोटी ७९ लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने हा अमली पदार्थ दिल्लीहून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. 'बेनी' नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून हा ड्रग्जचा साठा बंगळुरूत पोहोचविण्यासाठी निघालेला असताना पुणे पोलिसांनी कात्रज येथे सापळा रचून त्याला पकडले, अशी माहिती सरकारी पक्षाने न्यायालयात दिली.
दरम्यान, न्यायालयाने आरोपी प्रशांत सावंत याच्या पोलिस कोठडीत १८ जुलैपर्यंत वाढ केली आहे. आरोपी प्रशांत सुरेश सावंत (वय ३८, रा. येरवडा, सध्या लोहगाव रोड, पुणे) याला ८ जुलै रोजी कात्रज चौकातील आयसीआयसीआय बँकेसमोरील नव्या उड्डाणपुलाखाली अटक केली होती. त्याच्याकडून २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), एक मोबाईल आणि सफारी कंपनीची बॅग असा एकूण ५ कोटी ७९ लाख १० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि २२(क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-१ चे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक योगेश कोतकर यांनी मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. अमर पंढरीनाथ ननावरे यांनी बाजू मांडली. पुणे ते दिल्ली हे सुमारे १,३०० किलोमीटरचे अंतर असल्याने यापूर्वी मिळालेल्या पोलिस कोठडीत दिल्लीत सखोल तपास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
तसेच, या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची साखळी उलगडण्यासाठी आरोपीला सोबत घेऊन दिल्ली आणि बंगळुरू येथे तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी प्रशांत सावंत हा सराईत गुन्हेगार असल्याचेही उघड झाले आहे. त्याच्याविरुद्ध बंगळुरूच्या अमृताहल्ली पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.
याशिवाय पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलिस ठाण्यांत आर्म्स ॲक्ट, जबरी चोरी, गंभीर दुखापत आदी स्वरूपाचे एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणातील तपास आता दिल्ली, बंगळुरू आणि नायजेरियन ड्रग्ज नेटवर्कपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.