

पुणे: महापालिका हद्दीत टप्प्याटप्प्याने ३२ गावांचा समावेश झाल्यानंतर प्रशासनाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला असून, सध्याचे महापालिका मुख्यालय अपुरे पडू लागले आहे. वाढते विभाग, कर्मचारीसंख्या आणि नागरिकांच्या कामांचा ताण लक्षात घेऊन शिवाजीनगर येथील शिवाजी आखाड्याच्या जागेवर स्वतंत्र व अत्याधुनिक प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे अडीच एकर जागेवर हे नवे प्रशासकीय केंद्र उभारण्याचा विचार असून, त्यासाठी प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू आहे.
महापालिकेची स्थापना १९५० मध्ये झाली. त्यानंतर सुमारे १९६६ मध्ये सध्याच्या मुख्यालयाची इमारत उभारण्यात आली. वाढत्या गरजा लक्षात घेऊन २०१५ मध्ये लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र इमारतीचे काम सुरू करण्यात आले आणि ती २०१८ मध्ये कार्यान्वित झाली. या इमारतीमुळे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकांची व्यवस्था झाली; मात्र, प्रशासनासाठी जागेची कमतरता कायम आहे.
करआकारणी व करसंकलन, शिक्षण मंडळ, स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि आरोग्य विभागासह काही विभागांचे काम आजही सावरकर भवन व परिसरातील अन्य इमारतींमधून सुरू आहे. त्यामुळे बैठका, सादरीकरणे आणि दैनंदिन प्रशासकीय कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध कार्यालयांमध्ये धावपळ करावी लागते. महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी नव्या प्रशासकीय इमारतीची संकल्पना मांडली असून, त्यासाठी शिवाजीनगरातील शिवाजी आखाड्याची जागा निश्चित करण्याबाबत विचार सुरू आहे. ही महापालिकेच्या मालकीची जागा असून, ती दीर्घकालीन भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. आखाडा बालेवाडी परिसरात स्थलांतरित करण्यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, सकारात्मक प्रतिसादानंतर प्रस्तावाच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात येत आहे.
एकाच कार्यालयात महापालिकेचे सर्व विभाग
नव्या प्रशासकीय इमारतीत महापालिकेचे विविध विभाग एकत्र आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या वेगवेगळ्या इमारतींमध्ये विखुरलेले विभाग एकाच ठिकाणी आल्यास विभागांमधील समन्वय वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ऑनलाइन बैठक कक्ष, विविध समित्यांसाठी प्रशस्त सभागृहे तसेच नागरिकांच्या तक्रारी आणि कामांसाठी स्वतंत्र सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. नागरिकांची कामे एकाच ठिकाणी मार्गी लावणे आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे.
प्रस्ताव अद्याप प्राथमिक टप्प्यात
शिवाजी आखाड्याचे बालेवाडी येथे स्थलांतर, संबंधित जागेचा ताबा, नव्या प्रशासकीय इमारतीचा आराखडा आणि निधीची तरतूद याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. प्रस्तावाचे सविस्तर सादरीकरण पदाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसमोर करण्यात येणार आहे. त्यानंतरच प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
महापालिकेच्या विस्तारित हद्दीमुळे आणि वाढलेल्या प्रशासकीय कामकाजामुळे सध्याच्या मुख्यालयात जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे शिवाजी आखाड्याच्या जागेवर स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यात असून, पदाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसमोर सविस्तर सादरीकरण केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता