

पुणे: चार वर्षांच्या प्रशासक कालावधीनंतर पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. या महत्त्वाच्या सभेत तब्बल 90 विषय कार्यपत्रिकेवर ठेवण्यात आले होते. त्यांपैकी 90 विषयांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विषय मंजूर करण्यात आल्याची माहिती सभागृहनेते गणेश बिडकर यांनी दिली. कोणताही विषय प्रलंबित न ठेवता सर्व कामकाज पूर्ण करण्यात आले असून, नाईक बेटाचा विषय दफ्तरी दाखल करून चुकीचा पायंडा पडू दिला नसल्याचे बिडकर यांनी सांगितले.
सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आला. सूस-खिंड रस्त्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. मात्र, हे काम ठरावीक ठेकेदाराला दिल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त केली. सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. काही विषय राज्य सरकारच्या निर्णयाधीन असल्याने ते दफ्तरीदाखल करण्यात आले, तर उर्वरित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
नव्या प्रस्तावांवर प्रक्रिया करून आठ दिवसांत निर्णय घेण्याच्या सूचना देखील आयुक्तांना देण्यात आल्याचे बिडकर यांनी सांगितले. बिडकर म्हणाले, ‘भारत मंडपम’ संकल्पनेच्या अनुषंगाने पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. लोहगावमध्ये यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, विद्यमान आरक्षणांमध्ये कोणतीही कपात होणार नाही. विरोधक उगाच यावरून कांगावा करीत आहेत.
या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 50 हजार वाहनांची व्यवस्था असेल असे वाहनतळ बांधण्यात येणार आहे. तसेच, येथे चांगल्या दर्जाचे उद्यान देखील उभारण्यात येणार आहे. तसेच, हॉस्पिटल आणि भाजी मंडईसाठी असलेली आरक्षणे दोन किलोमीटरच्या परिसरात इतर ठिकाणी ‘ॲमेनिटी स्पेस’मध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा देखील बिडकर यांनी केला आहे.
या प्रकल्पासाठी निवडलेली जागा विमानतळाच्या उंची मर्यादांमुळे मोठ्या इमारतींसाठी मर्यादित असल्याने कन्व्हेन्शन सेंटरसाठी ती योग्य असल्याचे सांगण्यात आले. तसेच, या ठिकाणी विमानतळ, मेट्रो, हॉटेल्स आणि रुग्णालयांची चांगली कनेक्टिव्हिटी असल्याने भविष्यात मोठ्या कार्यक्रमांसाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एकावेळी सुमारे 30 हजार लोकांची क्षमता असलेले कार्यक्रम आयोजित करता येतील. राजकीय सभा, सामाजिक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी हे केंद्र उपयोगी ठरणार असल्याचे बिडकर म्हणाले.