

पांडुरंग सांडभोर
पुणे: शहरातील जैवविविधता उद्यान (बीडीपी) आरक्षणातील जमिनींचे पाच वर्षांत भूसंपादन झाले नाही, तर संबंधित जमीनमालकांना ॲकमोडेशन रिझर्व्हेशनच्या तत्त्वावर मर्यादित विकासाची परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस उच्चस्तरीय समितीने राज्य शासनाकडे केली आहे. त्यानुसार एकूण जमिनीच्या किमान ७० टक्के क्षेत्रावर कायमस्वरूपी जैवविविधता उद्यान विकसित करणे बंधनकारक असेल, तर उर्वरित ३० टक्के क्षेत्रावर कठोर पर्यावरणीय अटींच्या अधीन राहून बांधकाम करता येईल, असे पर्याय सुचविले आहेत.
महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमधील डोंगरमाथा आणि उतारावर बीडीपी आरक्षण टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने ऑगस्ट २०१५ मध्ये घेतला होता. मात्र, गेल्या ११ वर्षांत एकाही चौरस फुटाचे भूसंपादन झालेले नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माजी आयएएस अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने काही महत्त्वाच्या शिफारशी राज्य शासनाला केल्या आहेत. त्यात बीडीपीग्रस्तांना १०० टक्के मोबदला देण्याची शिफारस केली असून, अधिसूचनेपासून पाच वर्षांच्या आत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. या मुदतीतही जमीन संपादित न झाल्यास टप्प्याटप्प्याने ॲकमोडेशन रिझर्व्हेशनवर आधारित विकास मॉडेल लागू करण्याचा पर्याय सुचवला आहे.
या प्रस्तावानुसार, ७० टक्के क्षेत्रावर जैवविविधता उद्यान विकसित करण्याचे काम सुरू झाल्याच्या कालावधीपासून दोन वर्षांच्या आत हे काम पूर्ण करावे लागले. उद्यानाचे काम पूर्ण झाल्याचे नियोजन प्राधिकरण किंवा नियुक्त सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केल्यानंतरच उर्वरित क्षेत्रावर बांधकाम करता येईल. बांधकामासाठी तळमजला अधिक एक मजला अशी मर्यादा असेल. स्टिल्ट पार्किंगला परवानगी नसेल, तर अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दहा टक्क्यांपेक्षा अधिक ठेवता येणार नाही. डोंगराची मूळ भौगोलिक रचना आणि नैसर्गिक उतार कायम ठेवणे तसेच पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व तंत्रज्ञानाचा वापर करणे बंधनकारक असेल.
बीडीपी क्षेत्रात काँक्रीटचे रस्ते बांधण्यास परवानगी नसेल. त्याऐवजी पाणी जमिनीत मुरण्यास अनुकूल असलेल्या वॉटर बाऊंड मॅकॅडम प्रकारच्या रस्त्यांना कमाल १२ मीटर रुंदीपर्यंत परवानगी असेल. डोंगराची कपात न करता रस्त्यांची दिशा आणि छेद आराखडा महापालिका आयुक्त निश्चित करतील. पावसाच्या पाण्यासाठी नैसर्गिक खुली निचरा व्यवस्था निर्माण करावी लागेल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना परवानगी असून, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करता येईल.
'त्या' जागेवरील बीडीपी आरक्षण वगळण्याचाही पर्याय
बीडीपी क्षेत्रातील काही जमिनींवर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. अशा ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक विकसित क्षेत्राने वेढलेल्या रिक्त भूखंडांचे स्थानिक उद्यानात रूपांतर करता येईल. भूखंडावर बांधकाम असल्यास तांत्रिक पडताळणीनंतर आरक्षण वगळण्याचा विचार करता येईल. अशा जमिनी विकासयोग्य केल्यास विशेष प्रीमियम आकारून त्यातून मिळणारा निधी उर्वरित बीडीपी उद्यानांच्या विकासासाठी वापरण्याची शिफारसही समितीने केली आहे.