Pune Municipal Corporation Food Testing Machine: महापालिकेची १२ लाखांची फूड टेस्टिंग मशीन अखेर सापडली; १० वर्षे स्टोअररूममध्येच पडून

गायब झाल्याचा समज, पोलिसांत तक्रार आणि अखेर प्रयोगशाळेतील दुसऱ्या स्टोअरमध्ये पॅकबंद अवस्थेत मशीनचा शोध; मालमत्ता व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
Food Testing Machine Missing
Food Testing Machine MissingPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेने सुमारे १२ लाख रुपये खर्च करून खरेदी केलेली आणि गेली दहा वर्षे वापराविना धूळ खात पडलेली फूड टेस्टिंग मशीन (फायबर एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम) अखेर सापडली आहे. विशेष म्हणजे, ही मशीन गायब झाल्याची माहिती जुलै महिन्यातील महापालिकेच्या प्रश्नोत्तरातून समोर आली होती. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही करण्यात आला होता. मात्र, सखोल तपासणीनंतर ही मशीन त्याच प्रयोगशाळेतील दुसऱ्या स्टोअररूममध्ये पॅकबंद अवस्थेत आढळून आली.

Food Testing Machine Missing
Pune Municipal Corporation Security Recruitment: महापालिकेच्या सुरक्षारक्षक भरतीत 'शिफारस'चाच बोलबाला? आयुक्तांच्या कबुलीने खळबळ

राज्याच्या अन्‍न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर अन्नभेसळीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असतानाच महापालिकेची फूड टेस्टिंग यंत्रणा गायब झाल्याचे प्रकरण उघड झाल्याने प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. आता मशीन सापडल्याने तिचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.

Food Testing Machine Missing
Rajgurunagar Illegal Hoardings: राजगुरुनगरमध्ये अनधिकृत होर्डिंग्जवर नगराध्यक्षांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स; दुहेरी निकषांवर नागरिकांचा संताप

महापालिकेच्या आरोग्य विभागाने सन २०१६-१७ मध्ये ११ लाख ९८ हजार रुपये खर्च करून ही मशीन खरेदी केली होती. ती कोंढवा येथील फूड हायजीन अँड हेल्थ लॅबोरेटरीमध्ये ठेवण्यात आली होती. प्रयोगशाळेचा करार संपल्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये तेथील सर्व उपकरणांचा ताबा तत्कालीन पशुवैद्यकीय अधीक्षकांकडे देण्यात आला. त्यानंतर या मशीनचा वापरच झाला नाही.

Food Testing Machine Missing
Pune Waste Processing Tender Controversy: पुणे महापालिकेच्या कचरा प्रक्रिया निविदेवर काँग्रेसचा आक्षेप; ५६७ कोटींच्या अतिरिक्त खर्चाचा दावा

नगरसेवक महेश वाबळे यांनी सर्वसाधारण सभेत मशीन कार्यरत आहे का? आणि तिचे सर्व भाग उपलब्ध आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाने लेखी उत्तरात मशीन आढळून येत नसल्याचे नमूद केले होते. या उत्तरानंतरच कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला. दरम्यान, विभागप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी प्रयोगशाळेची पुन्हा सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी एका स्टोअररूमची तपासणी केली; मात्र दुसऱ्या स्टोअररूममध्ये कागदपत्रांच्या मागे पॅकबंद अवस्थेत ही मशीन आढळली.

Food Testing Machine Missing
PMPML Financial Crisis: पीएमपीएमएलच्या ५०० कोटींच्या तुटीवर नगरसेवकांचा हल्लाबोल; ‘अधिकारी करतात तरी काय?’ असा सवाल

मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले की, ही मशीन आता प्रयोगशाळा चालविणाऱ्या ठेकेदाराच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेत महापालिकेच्या विविध विभागांकडून पाठविण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने, शालेय पोषण आहार तसेच अन्य नमुन्यांची तपासणी केली जाते. प्रयोगशाळा चालकाकडून महापालिकेला दरमहा २ लाख ८० हजार रुपये भाडे मिळते. संबंधित मशीन दुसऱ्या स्टोअरमध्ये ठेवण्यात आली होती. ती आता सापडली असून, आवश्यक त्या कामासाठी तिचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मालमत्ता व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आल्या समोर

महापालिकेने लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली ही यंत्रणा तब्बल दहा वर्षे वापराविना पडून राहिल्याने सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मशीन गायब असल्याचा समज, त्यानंतर पोलिसांकडे तक्रार आणि अखेर ती त्याच प्रयोगशाळेतील दुसऱ्या स्टोअरमध्ये सापडल्याने महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीही समोर आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news