

पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील साडेसहा हजार कोटी रुपये खर्चाचा मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याची जय्यत तयारी करणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने (एमएसआरडीसी) याच रस्त्यावरील आडोशी बोगद्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मात्र तितकासा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. या बोगद्याचे खडकाळ छत कोसळून महिना लोटला असला तरी त्याची दुरुस्ती अद्याप सुरूच झालेली नाही.
पवई येथील आयआयटीतील तज्ज्ञांकडून त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाबाबतचे मार्गदर्शन मिळाल्यानंतरच हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे ‘एमएसआरडीसी’चे कार्यकारी अधिकारी राकेश सोनवणे यांनी सांगितले. ‘आयआयटी’तील तज्ज्ञांनी सुमारे तीन आठवड्यांपूर्वी बोगद्याचे सर्वेक्षण करून आपली निरीक्षणे नोंदविली आहेत. त्याआधारेच ते आपला अहवाल देणार आहेत, असेही ते म्हणाले.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी खोदण्यात आलेल्या 263 मीटर लांबीच्या या बोगद्याच्या मजबुतीकरणासाठी जिओटेक्निकल तज्ज्ञांच्या सल्ल्याने शॉर्टक्रीट, बोल्टिंग आणि स्ट्रक्चरल काँक्रीट लायनिंगचा वापर केला होता. तथापि, तरीही गेल्या 18 मार्च रोजी बोगद्यातील छताचा सुमारे 20 ते 25 फूट लांब आणि सुमारे दहा ते बारा फूट रुंदीचा खडकाळ भाग खाली कोसळला. या घटनेमुळे दोन-तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशीप्रमाणेच भातन, मडाप, खंडाळा आणि कामशेत येथील दोन बोगद्यांसह सहा बोगदे आहेत. आडोशी बोगद्यातील या दुर्घटनेमुळे इतर बोगद्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
तूर्तास मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी बंदच
सह्याद्री पर्वतरांगेतील या डोंगराची भौगोलिक रचना डेक्कन ट्रॅप या ज्वालामुखीय खडकावर आधारित आहे. त्यामुळे येथील भूस्तर लेयर-केकसारखा आहे. भूगर्भातील हालचालींमुळे यातील स्तर एकमेकांपासून अलग होतात व निसटतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या बोगद्याची दुरुस्ती व मजबुतीकरण कसे करणार याबाबत जाणकारांमध्ये उत्सुकता आहे. तूर्तास दुर्घटनास्थळावरील मुंबई मार्गिका बॅरीकेडिंग करून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. दुरुस्तीनंतरच ती खुली करण्यात येईल.
मोठा गाजावाजा करीत मिसिंग लिंकचे उद्घाटन करण्याच्या तयारीत असलेले ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ मिसिंग लिंक सुरू करण्यापूर्वी आडोशीची दुरुस्ती करणार की नाही? या बोगद्यासह बोरघाटातील सर्व बोगद्यांचे तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने सुरक्षा ऑडीट करावे.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच