Pune News : महामेट्रो करणार वाहतूक आराखडा

Pune News : महामेट्रो करणार वाहतूक आराखडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचा सर्वंकष वाहतूक आराखडा महामेट्रोकडून तयार करण्यात येणार असून, त्यानुसार वाहतूक व्यवस्थेच्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. व्यवस्थापकिय संचालक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हर्डीकर यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधून मेट्रोच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

या वेळी ते म्हणाले, शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा 2018 मध्ये तयार केला गेला होता. त्यानंतर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा भागही विकसित होत आहे. दर पाच वर्षांनंतर वाहतूक आराखडा तयार करून, त्यादृष्टीने वाहतूकविषयक उपाययोजना केल्या जातात. याचप्रमाणे मेट्रोकडूनही सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला जाणार आहे.

हर्डीकर म्हणाले, 'शहराची रचना आणि विस्तार लक्षात घेता, सध्या अस्तित्वात असलेल्या दोन मेट्रो मार्गावर प्रवासी संख्या कशी वाढविता येईल, प्रवाशांना आणखी काय सुविधा हव्या आहेत यादृष्टीने मेट्रो प्रशासन विचार करीत आहे. पीएमपीच्या बस फिडर सेवेबरोबरच रिक्षा फिडर सेवा सुरू होत आहे. त्याचे दरही ठरविले आहेत.' या सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रत्येक स्टेशननिहाय सर्व्हेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.

बारा ठिकाणी पार्किंगसाठी जागा

सध्या मेट्रो प्रवाशांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी स्थानकावर पुरेशी जागा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात मर्यादा असून, तूर्तास बारा ठिकाणी महापालिकेकडून जागा मिळाल्या आहेत. त्या जागा पार्किंगसाठी विकसित केल्या जात आहेत.

दोन्ही मार्ग मार्चमध्ये पूर्णपणे कार्यान्वित

शहरातील वनाज ते रामवाडी या मार्गावर सध्या रुबी हॉल क्लिनिकपर्यंत मेट्रो धावते, तर दुसर्‍या मार्गावरील मेट्रो पिंपरी-चिंंचवड ते शिवाजीनगर अशी सुरू आहे. या दोन्ही मार्गावरील उर्वरित कामे यावर्षी डिसेंबरअखेर पूर्ण होतील तसेच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गावरील कामे प्रगतिपथावर असून, ती मार्च 2024 पर्यंत पूर्ण होतील. अंतिम परवानगी मिळाल्यानंतर या दोन्ही मार्गांवरील सेवा पूर्णपणे सुरू होईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news