

पुणे: नाताळाच्या सुट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजली असून, हवेत गारवा वाढल्यामुळे थंड आणि रसदार फळे खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. बोरे खाण्यास नागरिक पसंती देत आहेत. त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात गोड, आंबट चवीच्या बोरांना मागणी वाढली आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने बोरांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील डाळिंबाचा हंगाम संपल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कर्नाटक, गुजरात येथून डाळिंबाची आवक होत आहे. परराज्यातील डाळिंब राज्यातील डाळिंबाच्या तुलनेत दर्जेदार नाहीत. मात्र, बाजारात होत असेलल्या मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने या डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
थंडीमुळे फळांच्या उत्पादनासह आवकेवर काहीसा परिणाम झाला आहे. रसदार फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने खरेदीदारांनी फळांची खरेदी कमी केल्याचे चित्र आहे. परिणामी, बाजारात बहुतांश फळांची आवक-जावक कायम असून, दर स्थिर आहेत.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 200-400, मोसंबी : (3 डझन) : 210-350, (4 डझन) : 120-200, संत्रा : (10 किलो) : 400-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 80-280, आरक्ता : 10-70, गणेश : 10-50, कलिंगड : 7-15.
खरबूज : 15- 30, पपई : 8-20, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-500, अननस (1 डझन): 100-600, गोल्डन सीताफळ (1 किलो) : 10-60, बोरे (10 किलो) : चमेली 300-360, चेकनट 750-800, उमराण 100-140, चण्यामण्या 600-1100.