

पुणे : पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर आहे.
२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी सहा दिवस उलटूनही महायुती आणि महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. परिणामी, केवळ दोन दिवस उरले असताना अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार असून, इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आत्तापर्यंत केवळ 48 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, अर्ज भरण्यासाठी सहा दिवस लोटले तरीही उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुक उमेदवारांनी पसंती दाखवलेली नाही. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी आत्तापर्यंत कोणत्याही प्रमुख पक्षाने उमेदवारांची घोषणा केलेली नाही. अर्जांचे वितरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तब्बल दहा हजारांहून अधिक अर्जांची विक्री झाली असली, तरी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या केवळ ४८ आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. मंगळवारी (दि. ३०) दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार असल्याने सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी आणि गोंधळाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी काही पक्षांनी यादी तयार ठेवूनही ती जाहीर करण्यास विलंब केल्याचे बोलले जाते. गेल्या तीन–चार वर्षांत प्रभागांमध्ये सातत्याने काम, विविध उपक्रम आणि लाखो रुपयांचा खर्च करूनही तिकीट मिळेल की नाही, याची धास्ती इच्छुकांना लागली आहे. त्यामुळे उमेदवारीबाबतची अनिश्चितता अधिकच तीव्र झाली आहे.
भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (उबाठा) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांमध्ये अंतर्गत बैठका, सर्वेक्षणे, संभाव्य आघाड्या आणि स्थानिक समीकरणांवर चर्चा सुरू आहे. मात्र, या घडामोडींमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम आणि अस्वस्थता वाढली आहे. अनेकांनी अर्ज तयार ठेवला असून, शेवटच्या क्षणीच निर्णय घेण्याची रणनीती आखली आहे.