

बाणेर : सोमवार, मंगळवार अखेरचे दोन दिवस अर्ज भरण्यासाठी राहिले असल्याने आता उमेदवार अर्ज भरण्याच्या लगबगीत दिसणार आहेत. औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधून एकूण २३५, तर प्रभाग क्रमांक ९ मधून १९१ अर्जांची विक्री झाली आहे.
एकूण ४२६ अर्जांपैकी शनिवारी प्रभाग क्रमांक ८ मध्ये फक्त आपच्या एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उर्वरित अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची भाऊ गर्दी आज सोमवारी व उद्या मंगळवारी क्षेत्रीय कार्यालयात पाहावयास मिळणार आहे. या गर्दीचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे लक्षात येत आहे.
अनेक उमेदवार सोमवारी व मंगळवारी अर्ज भरणार असून, अर्ज भरताना रॅली काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयासमोर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
अनेक उमेदवारांनी येऊन अर्जांची तपासणी करून घेतली आहे. त्यामुळे अर्ज फक्त दाखल करणे बाकी आहे. सोमवारी व मंगळवारी होणारी गर्दी पाहता आमची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. शांतता व सुव्यवस्था राखून आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने उमेदवारांना करण्यात येत आहे.
विजय नाईकल, सहाय्यक आयुक्त, औंध क्षेत्रीय कार्यालय
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयासमोर लावलेले बॅरिकेड.