

पुणे: संक्रातींचा सण जवळ आल्याने आवक कमी असून, मागणी वाढल्याने गुळाच्या दरात वाढ झाली. खाद्यतेलेही 15 किलो/लिटरच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांनी महागली. मात्र, मागणीअभावी साखरेचे दर आणखी पन्नास रुपयांनी घसरल्याचे येथील घाऊक बाजारातून सांगण्यात आले. मागणी कमी असल्याने नव्या नारळाच्या दरातही शेकड्यामागे शंभर रुपयांनी घट झाली.
संक्रांतीच्या सणानिमित्त सध्या गुळास मागणी वाढली आहे. यामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या गुळातील घसरण थांबली असून, दरात क्विंटलमागे 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली. संक्रांतीचा सण जवळ आल्याने पाव किलो, अर्धा किलो आणि एक किलो पॅकिंगमधील गुळास मागणी वाढली आहे. मात्र, सध्या या गुळाची आवक मर्यादित प्रमाणात होत आहे. यामुळे या गुळाच्या दरात क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली. नव्या नारळाची आवक वाढली असून, सध्या उठाव कमी असल्याने दर मंदीतच आहेत. गेल्या आठवड्यातही नव्या नारळाचे दर शेकड्यामागे शंभर रुपयांनी कमी झाले. मात्र, मद्रास आणि पालकोल नारळाच्या दरातील तेजी कायम होती.
साखरेत आणखी घसरण
केंद्र सरकारने 26 रोजी जानेवारी महिन्याचा साखरेचा कोटा खुला केला असून, एकूण 22 लाख टन इतकी साखर उपलब्ध करण्यात आली आहे. हा कोटा डिसेंबरइतकाच असून, पुरेसा आहे. सध्या बाजारात साखरेस मागणी कमी असून, पुरवठा मुबलक प्रमाणात होत आहे. यामुळे गेल्या आठवड्यातही साखरेच्या दरात क्विंटलमागे आणखी 50 रुपयांनी घट झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 3 हजार 950 ते 4 हजार रुपये होता.
येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:
साखर (प्रतिक्विंटल) 3950-4000 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2500-2600, रिफाईंड तेल 2110-2800, सरकी तेल 1920- 2240, सोयाबीन तेल 1880-2300, पामतेल 1875-2075, सूर्यफूल रिफाईंड तेल 2150-2275, खोबरेल तेल 4500 वनस्पती 1820-2250 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहर (सुवासिक) 12500-13000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4000-4200, लोकवन नं. 2 3600-40020, नं.3 3300-3600, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3800-4400, मिलबर 3100 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ एक्स्ट्रा 4600-4750, गूळ नं. 1 4350-4550, गूळ नं.2 4000-4200 गूळ नं.3 3800-3950, नं. 4 - 3600-3750, चिक्की गूळ 10/30 किलो 4600-5000, चिक्की गूळ एक, अर्धा व पाव किलो 5000- 6000 रु. कडधान्ये:-हरभरा 6500-6600, वाटाणा हिरवा 10000-11000, वाटाणा पांढरा 4400- 4500, काबुली चणा 7500-11000 रु.
खाद्यतेल महागले, खोबरेल तेल घसरले
रशियाने सूर्यफुलावरील निर्यात कर वाढविला आहे. तसेच, अलीकडेच रशियाने युक्रेनमधील सूर्यफूल तेलाचा साठा असलेल्या ठिकाणांवर हल्ले करून ते नष्ट केले आहेत. या कारणांमुळे सूर्यफूल तेलाची पडतळ वाढली आहे. तसेच सध्या स्थानिक बाजारात सर्वच खाद्यतेलांस मागणी वाढली असून, गेल्या आठवड्यात शेंगदाणा तेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे आणखी 50 रुपयांनी वाढ झाली. सोयाबीन तेल 40 रुपयांनी आणि सूर्यफूल तेल 30 रुपयांनी महागले. मात्र, नव्या खोबऱ्याची आवक सुरू झाल्याने आणि सध्या मागणीही कमी असल्यामुळे खोबरेल तेलाच्या दरात मात्र 15 किलोच्या डब्यामागे 600 ते 700 रुपयांनी घट झाली.