

Pune Kothrud murder news
पुणे: प्रेमप्रकरणाच्या रागातून एका तरुणाला प्रेयसीच्या घरच्यांनी घरी बोलावून बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. पुण्यातील कोथरूड परिसरात ही थरारक घटना घडली असून, याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश जाधव (वय २०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शिवाजीनगर भागात 'ऑफिस बॉय' म्हणून काम करत होता. नागेश आणि मेगासिटी परिसरातील एका अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. शनिवारी (दि. १४) संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास नागेशला त्याच्या प्रेयसीच्या मोबाईलवरून मेसेज आला. त्यानंतर तो आपल्या दुचाकीवरून तिला भेटण्यासाठी गेला.
रात्री आठ वाजेच्या सुमारास नागेशच्या आई सुरेखा जाधव यांना एका व्यक्तीचा फोन आला. "तुमचा मुलगा मेगासिटी येथे आहे. आम्ही त्याला मारले आहे, दहा मिनिटांत येऊन त्याला घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ," असे फोनवरून सांगण्यात आले. घाबरलेल्या आईने नातेवाईकांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
नातेवाईक जेव्हा मेगासिटीमधील इमारतीच्या टेरेसवर पोहोचले, तेव्हा तिथे नागेश विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी त्याला निर्घृणपणे मारहाण केली जात होती. नातेवाईकांनी तातडीने त्याला खाली आणले आणि रिक्षातून रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयात नेत असताना नागेशने आईला सांगितले की, "तिने मला मेसेज करून घरी बोलावले होते आणि तिथे तिच्या घरातील सर्वांनी मिळून मला मारले." दरम्यान, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मृत नागेशच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मुलीचे वडील अनिल शिंदे, आई वृषाली शिंदे आणि इतर आठ जणांनी मिळून हा कट रचला. मुलीच्या मोबाईलचा वापर करून नागेशला बोलावून घेतले आणि त्याची हत्या केली असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.