

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान, तर 16 तारखेला मतमोजणी होणार असून, तब्बल नऊ वर्षांनंतर महापालिकेच्या सभागृहात नवे नगरसेवक दाखल होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर एका बाजूला येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, दुसऱ्या बाजूला नव्या लोकप्रतिनिधींच्या स्वागतासाठी महापालिका प्रशासनाने सज्जता सुरू केली आहे. सभागृहातील रिकामी पक्ष कार्यालये, पक्षनेत्यांची कार्यालये तसेच महापालिका भवनातील अंतर्गत व्यवस्था, दुरुस्ती व रंगरंगोटीच्या कामांतून नव्याने सुसज्जता केली जात आहे.
निवडणुकीनंतर तत्काळ कामकाजाला सुरुवात करता यावी आणि नव्या नगरसेवकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या पक्ष कार्यालयांची डागडुजी सुरू आहे. रंगकाम, विद्युत व्यवस्था दुरुस्ती, फर्निचरची देखभाल, पाणीपुरवठा व स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. महापालिका सभागृह परिसरातही स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे.
दरम्यान, नव्या सभागृहाच्या कार्यकाळात विकासकामांना गती देता यावी, यासाठी येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारीही जोरात सुरू आहे. महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या विभागाशी संबंधित अद्ययावत माहिती, प्रलंबित प्रकल्प, प्रस्तावित विकासकामे तसेच आवश्यक निधीच्या मागण्या सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या माहितीच्या आधारे अर्थसंकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत असून, नव्या नगरसेवकांच्या अपेक्षांना अनुसरून विकासाभिमुख तरतुदी करण्यावर भर दिला जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया, अर्थसंकल्पीय नियोजन आणि प्रशासकीय तयारी या तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी सुरू असलेल्या हालचालींमुळे पुणे महापालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीने प्रशासनिक यंत्रणा अधिक गतिमान होण्याची चिन्हे दिसत आहेत. नव्या सभागृहाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.