

पुणे: येरवडा पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली तर, दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. खराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली.
राज राजेशाम सविता (२८, रा. खराडी) आणि सुनील शिवाजी शिंदे (३७, रा. काळेपडळ, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांविरुद्ध पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती व त्याचा साथीदार ग्राहकांना फोनवरून मुली पुरवून अनैतिक व्यापार करत असल्याची माहिती पोलिस हवालदार रमेश नवले यांना मिळाली होती. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार खराडी, येरवडा परिसरातील लॉजवर मुलींना पाठवले जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.
ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गिते यांना कळवण्यात आली. त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची पडताळणी केली.
त्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकून अनैतिक व्यापारासाठी आणलेल्या दोन पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईदरम्यान पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक किशोर बेरड, कर्मचारी रमेश नवले, पोलिस हवालदार कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, सागर ढवळी, लक्ष्मण ढोकळ, नितीन चांदणे, ज्योती नाईक यांच्या पथकाने केली.