

वालचंदनगर: महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा, यासाठी भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देणाऱ्या ऑनलाइन पोर्टलचे औपचारिक उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.
या प्रमाणपत्रामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा थेट लाभ महिलांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना मंत्री भरणे म्हणाले, ‘२२ जून २०२६ रोजी लागू झालेल्या ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता, प्रमाणपत्र आणि स्वतंत्र डेटाबेस तयार करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पात्र महिलांना krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
या योजनेत केवळ जमिनीच्या मालकीवर भर न देता शेतीतील प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व दिले जाणार आहे. पिकांची लागवड, बीजोत्पादन, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग आणि फलोत्पादन करणाऱ्या महिलांचा यात समावेश असेल.’
भूमिहीन महिला शेतकरी, शेतमजूर आणि भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या १८ वर्षांवरील महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. या कार्यक्रमास कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक उदय देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रणिता कुदळे, शुभांगी बरळ, कृषी अधिकारी योगेश फडतरे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.