

पुणे : व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या पतीने कौटुंबिक वादातून पत्नीचे नाक व तोंड ब्लँकेटने दाबून तिचा खून केला. त्यानंतर रात्रभर पती तसाच पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. सकाळी 8 वाजता त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून आपण पत्नीचा खून केल्याची माहिती दिली.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. बिंदू दिलीप कंडाथील (वय 53, रा. ओरियन कॉम्प्लेक्स, चिखलवाडी, खडकी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर दिलीप नंबुरी कंडाथील (वय 56) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार विलास फुलसिंग राठोड यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलीप कंडाथील हा व्यावसायिक असून, व्यवसायात नुकसान झाल्याने तो कर्जबाजारी झाला आहे. पहिल्या पत्नीसोबत कंडाथीलचा घटस्फोट झाला असून, बिंदू ही त्याची दुसरी पत्नी आहे.
बिंदू ही नेहमी डिप्रेशनमध्ये राहत असून तिच्यावर उपचार सुरू होते. त्यातूनच बिंदूला नेहमी संशय होता की, आपला पती दिलीप हा पहिल्या घटस्फोटीत पत्नीला भेटतो. या संशयावरून ती नेहमी भांडण करत होती. त्यातून पत्नी झोपली असताना 24 फेबुवारी रोजी रात्री 11 वाजता त्याने तिच्या तोंडावर ब्लँकेट टाकून तिचा खून केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सीएच रजनीकांत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनात बिंदूचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी दिलीप कंडाथील याला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद देठे पुढील तपास करत आहेत.
एका बाजूला कर्जबाजारीपणा आणि दुसरीकडे पत्नीचे रोजचे भांडण यामुळे दिलीप कंडाथील कंटाळून गेला होता. त्यातून पत्नी झोपली असताना 24 फेबुवारी रोजी रात्री 11 वाजता त्याने तिच्या तोंडावर ब्लँकेट टाकून तिचे नाक, तोंड दाबले. त्यात श्वास गुदमरुन तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्रभर तो तसाच तिच्या मृतदेहा शेजारी बसून राहिला. आपणही जीव द्यावा, असा विचार त्याच्या मनात येत होता. परंतु, त्याची हिंमत झाली नाही. शेवटी सकाळी 8 वाजता त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून आपण पत्नीचा खून केल्याचे सांगितले.