

पुणे: पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यातील सुमारे ५० ते ६० हजार रुपयांची रोकड चोरी केली. सोमवारी रात्री साडेअकरा ते मंगळवारी पहाटे सव्वापाचच्या दरम्यान ही घटना घडली होती.
चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाणाऱ्या लाकडी दरवाजाची कडी तोडून ही चोरी केली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मंदिराचे विश्वस्त तसेच पुजारी हेरंब दत्तात्रय ठकार (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी चोरटा संग्राम राजेंद्र जाधव (वय 29, मूळ गडहिंग्लज, कोल्हापूर) याला अटक केली आहे. पोलिस सहआयुक्त संजय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठकार यांनी ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता मंदिर बंद करून दरवाजाला कुलूप लावले होते. मंगळवारी पहाटे मंदिर उघडण्यासाठी आल्यानंतर गाभाऱ्यात जाणाऱ्या लाकडी दरवाजाची कडी तुटलेली आढळून आली. त्यानंतर मंदिरातील दानपेट्यांची पाहणी केली असता मुख्य गाभाऱ्यासमोरील दोन लाकडी दानपेट्या तसेच महादेव आणि विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीसमोरील दानपेटीचे लॉक तुटलेले दिसून आले. घटनास्थळी लोखंडी रॉडही आढळून आला.
मारुती मंदिराजवळील पत्र्याची दानपेटीही चोरट्यांनी फोडल्याचे निदर्शनास आले. मंदिराच्या उघड्या पडलेल्या भिंतीवरून चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. लोखंडी रॉडच्या साहाय्याने दानपेट्या उचकटून त्यातील दानाची सुमारे ५० ते ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. मंदिर परिसरासह लगतच्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांकडून या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चोरट्याचा माग काढून त्याला अटक केली.