

पुणे: राज्य सरकारने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केलेले आहेत. ऑक्टोबर महिना सुरू झाल्याने रब्बी हंगामाची शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली असली तरी परतीचा पाऊसच नसल्यामुळे पेरण्या रखडणार असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्यांसाठी सुरुवातीलाच वळवाच्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. तरच पेरण्यांखालील क्षेत्र सरासरी गाठू शकते. कृषी विभागाने 2 लाख 26 हजार 790 हेक्टरवरील पिकांच्या पेरण्यांचे नियोजन केलेले आहे. मात्र, पेरण्यांचे भवितव्य सध्यातरी अंधातरी असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली.
जिल्ह्यात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, मका आणि भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. भातपिकासह उसाची काढणी लवकर झाल्यास शेतकऱ्यांकडून हरभरा आणि गव्हाच्या पेरण्यांना प्राधान्य दिले जाते. रब्बी पिकांच्या पेरण्यांना ज्या ठिकाणी सिंचनाची सुविधा, विहिरी, बोअरवेल, तलाव असतील आणि पाण्याची उपलब्धता असल्यास थोड्या फार प्रमाणात रब्बी पेरण्या काही भागात होऊ शकतात. मात्र, सरसकट अशी स्थिती नाही. खरिपातील पिके बहुतांश भागात पाण्याअभावी हातची गेलेली आहेत.
पश्चिम पट्ट्यातील तालुक्यात पावसाचे प्रमाण खरिपात चांगले राहीले. त्यामुळे प्रमुख पीक असलेल्या भाताच्या पिकालाही पावसाची नितांत आवश्यकता आहे. पाण्याअभावी खरिपाची पिके वाया गेलेली असल्याने दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. परतीच्या पावसाची हजेरी झाल्यास पेरण्यांचा विचार शेतकऱ्यांकडून केला जाऊ शकतो. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरण्या होऊ शकणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती व पावसाची हजेरी नसल्यामुळे जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे परतीच्या पावसाची दमदार हजेरी राहिल्यासच रब्बी पिकांच्या पेरण्यांच्या आशा पल्लवित होतील. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तेथे काही भागात पेरण्या होतील. मात्र, हे प्रमाणही कमीच राहण्याची शक्यता आहे. पावसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी, मका या पिकांच्या पेरण्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते. पेरण्यांखालील क्षेत्र आणि पुरेसा बियाण्यांच्या पुरवठ्याचे नियोजन केले असून, कोणतीही अडचण आल्यास नजिकच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा.
वैभव तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.