

पुणे: पुतण्याने केलेली धक्काबुक्की आणि डोळ्यांदेखत केलेला पत्नीचा विनयभंग सहन न झाल्याने हृदयविकाराचा तीव झटका येऊन भवानी पेठेतील गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहीद इनामदार रविवारी मृत्युमुखी पडले. जागेच्या वादातून घडलेल्या या प्रकाराबद्दल पोलिसांनी आझम कॅम्पसमधील महाराष्ट्र कॉस्मोपिलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आबेदा इनामदार आणि त्यांच्या तीन मुलांसह अकरा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आझम कॅम्पससमोरील गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात रविवारी सकाळी हा प्रकार घडला. त्याबाबत मयत शाहिद इनामदार यांचा मुलगा मुस्तफा सय्यद बाकरहुसेनी इनामदार (वय 31, रा. 1027, नाना पेठ, पुणे ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आबेदा पीरपाशा अब्दुलरज्जाक इनामदार, परवेज पीरपाशा अब्दुलरज्जाक इनामदार, इफ्तिकार पीरपाशा अब्दुलरज्जाक इनामदार आणि तन्वीर पीरपाशा अब्दुलरज्जाक इनामदार (सर्व. रा. दौलत बिल्डिंग, पदमजी पार्क, नाना पेठ) तसेच आरिफ फकीर मोहम्मद चौधरी, अफजल कादर खान आणि त्यांच्यासमवेत असलेल्या पाच बाउन्सर्स अशा एकूण अकरा जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्याने मृत झालेले शाहिद इनामदार हे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक पी. ए. इनामदार यांचे धाकटे बंधू व गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष होते. शनिवारी रात्री आरोपींपैकी काही जण त्यांच्या या ट्रस्टच्या इमारतीत शिरले व तेथील लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, प्रोजेक्टर असे सुमारे 12 लाख रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य गाडीत भरून त्यांनी चोरून नेले. या घटनेची माहिती मिळताच शाहिद इनामदार, त्यांची पत्नी व मुलांसह ट्रस्टच्या इमारतीपाशी गेले व तेथे थांबून राहिलेल्या आरोपींना त्यांनी तेथे थांबण्याबद्दल जाब विचारला. त्यावर ते म्हणाले की, ही जागा परवेज व इफ्तिकार इनामदार यांची आहे. त्यांनीच आम्हाला हे साहित्य येथून काढण्यास सांगितले असल्याचे सांगत त्यांनी शाहिद इनामदार यांच्या छातीवर प्रहार करीत त्यांना खाली ढकलले.
त्याचवेळी शाहिद यांचे पुतणे परवेज व इफ्तेकार इनामदार यांनी शाहिद यांच्या पत्नीचा विनयभंग करीत त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेचा धक्का बसल्याने शाहिद खाली कोसळले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांचा तीव हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकारानंतर खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक दाढे आणि कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणली. खडक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दाढे पुढील तपास करीत आहेत.
भारतीय न्यायसंहितेच्या या कलमांनुसार दाखल झाला गुन्हा
बीएसएन 74 - विनयभंग, 131 - गंभीर दुखापत, 351 (3) - गुन्हेगारी स्वरूपाची धमकी, 352 - बदनामी व प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न, 303 (2) - चोरी, 189 (1) व (2) बेकायदेशीर जमाव जमविणे, 190 - बेकायदेशीर जमाव जमवून गुन्हेगारी कृत्य करणे, 333 - सरकारी कामात अडथळा निर्माण करणे.