

पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांना थेट तक्रार नोंदविता यावी आणि त्या तक्रारींचे निराकरण 72 तासांत व्हावे, या उद्देशाने पुणे महापालिकेने मोठ्या दिमाखात सुरू केलेले ‘पीएमसी रोड मित्र’ हे मोबाईल ॲप बंद पडल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे हे ॲप कार्यरत नसल्याची माहिती महापालिका प्रशासनालाच नसल्याचे समोर आल्याने या उपक्रमाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते 12 ऑगस्ट 2025 रोजी या ॲपचे अनावरण करण्यात आले होते. नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढून ॲपवर अपलोड केल्यास ती तक्रार थेट महापालिकेच्या पथ विभागाकडे पोहोचेल आणि संबंधित खड्डे 72 तासांच्या आत बुजवले जातील, असा दावा त्यावेळी प्रशासनाने केला होता. तसेच खड्डा बुजविण्याची जबाबदारी संबंधित उपअभियंत्यावर निश्चित करण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर ‘पूर्वी व नंतर’चे फोटो अपलोड करून तक्रार बंद केली जाणार, अशी सुविधाही या ॲपमध्ये देण्यात आली होती.
नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींच्या निरीक्षणासाठी या ॲपसोबत विशेष डॅशबोर्डही तयार केला होता. कोणत्या क्षेत्रातून किती तक्रारी प्राप्त झाल्या, त्या किती कालावधीत निकाली काढल्या, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट मिळणार होती. त्यामुळे जबाबदारी निश्चित होऊन शहरातील खड्ड्यांचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला होता.
मात्र, प्रत्यक्षात काही काळानंतरच हे ॲप बंद पडल्याचे समोर आले आहे. ॲपवर तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केल्यास ते कार्यरत नसल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम सध्या निष्क्रिय ठरल्याची टीका होत आहे.
ॲपबद्दल पथ विभागप्रमुख अनभिज्ञ
या ॲपवर आतापर्यंत किती तक्रारी नोंदविण्यात आल्या आणि त्यापैकी किती खड्डे बुजविण्यात आले, याबाबत विचारले असता पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर यांनी संबंधित माहिती क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, ॲप बंद असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ॲप सुरूच असल्याचे सांगितले. त्यामुळे पथ विभागाच्या प्रमुखांनाच या ॲपच्या स्थितीबाबत स्पष्ट माहिती नसल्याचे दिसून आले.
ॲप बंद असल्याचे समोर आले आहे. संबंधित विभागांना तत्काळ हे ॲप सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांसाठी लवकरच हे ॲप पुन्हा कार्यरत केले जाईल.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका