

पुणे: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळीत झाल्याने पुणे शहरासह राज्यातील हॉटेल व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून हॉटेलचालकांनी आता ई-शेगड्या आणि इलेक्ट्रीक भट्ट्यांकडे मोर्चा वळविला आहे. मात्र, मागणीत अचानक झालेली प्रचंड वाढ आणि अपुरा पुरवठा, यामुळे पुण्यातील बाजारपेठेत ई-शेगड्यांचा दुष्काळ निर्माण झाला असून, विक्रेत्यांकडील साठा पूर्णपणे संपला आहे.
पुणे व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि ई-शेगड्यांचे विक्रेते नितीन काकडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना या गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, रविवारपासून कमर्शिअल गॅसपुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेलचालकांची धावपळ सुरू आहे. इंडक्शन आणि कॉईल भट्ट्यांना अभूतपूर्व मागणी वाढली आहे. मुंबई आणि राजकोट येथून या मालाचा पुरवठा होतो.
मात्र, तेथील साठाही संपल्याने पुरवठादार आता आमच्यासारख्या विक्रेत्यांचे फोन उचलण्यास टाळाटाळ करीत आहेत. ‘आज माल नसेल तर चार दिवसांनी द्या, पण शेगडी द्या; अन्यथा आमचे हॉटेल बंद पडेल,’ अशा शब्दांत हॉटेलमालक आपली व्यथा मांडत आहेत. अनेक ग््रााहक (हॉटेलचालक/मालक) आगाऊ पैसे देऊन बुकिंग करीत आहेत. माझ्या माहितीनुसार, पुणे हे हॉटेलिंगबाबतीत देशात आघाडीवर असल्याने येथे इलेक्ट्रीक भट्ट्यांची सध्या सर्वाधिक गरज भासत आहे.
पुण्यात कमर्शिअल ई-शेगड्या विक्री करणारी साधारण 20 ते 25 मोठी दुकाने आहेत. मात्र, सर्वांची अवस्था सारखीच आहे. 10 हजार वॅटच्या मोठ्या भट्ट्या सहसा कोणी घेत नाही आणि त्या स्टॉकमध्येही नाहीत. छोट्या ठेल्यांपासून ते मोठ्या पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वांनाच आता विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा आधार वाटत आहे. पण, बाजारपेठेत मालच उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यवसाय कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
मी आणि माझा भाऊ आमच्या दोघांचेही पिंपरीमध्ये हॉटेल आहे. हॉटेलला लागणारा कमर्शिअल गॅसपुरवठा बंद झाल्यामुळे आम्ही दोघेही पुण्यातील या ई-शेगड्यांच्या मार्केटमध्ये आलो आहोत. ई-शेगड्यांची खरेदी करून हॉटेल सुरू राहील, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सिलिंडर नसल्याने आमच्यावर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शासनाने तातडीने यावर तोडगा काढून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.
आरती शेट्टी, हनुमंत रेड्डी, हॉटेलमालक, पिंपरी
गेल्या चार-पाच दिवसांत 400 ते 500 जणांना भट्ट्या पुरविल्या आहेत. मात्र, साठा नसल्यामुळे 700 ते 800 ग््रााहकांना रिकाम्या हाती परत पाठवावे लागले. सद्य:स्थितीत रोज माल येतोय आणि तासाभरात संपतोय.
नितीन काकडे, उपाध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ आणि व्यावसायिक ई-शेगड्या विक्रेते